राहुल गांधी यांचे वक्तव्य; जयपूरमध्ये शक्तिप्रदर्शन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत हा हिंदूंचा देश आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. महागाईविरोधात जयपूरमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल तसेच पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सहभागी झाल्या होत्या.

या देशात हिंदुत्ववाद्यांमुळे महागाई वाढत आहे. जनतेला त्रास होत आहे.  सात वर्षांत पंतप्रधानांच्या तीन ते चार उद्योगपती मित्रांनी देशाचे वाटोळे केले आहे असा आरोप राहुल यांनी केला.

हिंदुत्ववादी सत्तेसाठी हयात घालवतात. त्यांना सत्याशी काही देणेघेणे नसते अशी टीका राहुल यांनी केली. सत्ताग्रह हा त्यांचा मार्ग असतो, सत्याग्रह नव्हे असा टोलाही लगावला. हिंदू मात्र निर्भीडपणे सामोरा जातो, एक इंचही मागे हटत नाही. मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही असे राहुल यांनी सांगितले.

 देशातील ९० टक्के नफा हा २० टक्के कंपन्या कमावत असल्याचा आरोपही राहुल यांनी केला. काँग्रेस सरकारांनी कृषीकर्जे माफ केली. कारण शेतकरी देशाचा कणा आहे. मात्र मोदींनी शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, असे  राहुल म्हणाले.  चीनने लडाख, अरुणाचल प्रदेशमध्ये भारताचा भूभाग बळकावला असून, पंतप्रधान म्हणतात, काहीच घडले नाही असा आरोप राहुल यांनी केला. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित होते.

‘सध्या बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक’

करोनाकाळात मोदींनी उद्योगपतींचे कर माफ केले. मात्र जे कामगार शेकडो किलोमीटर चालत गेले त्यांना बसची व्यवस्था केली नाही. त्यातील १०० ते २०० कामगार रस्त्यावर मृत्युमुखी पडले. गेल्या साठ वर्षांत बेरोजगारी सर्वाधिक असल्याचा आरोप त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Statement by rahul gandhi india is a country of hindus not of pro hindu activists akp