भारतीय दूतावासातील उपमहावाणिज्य आयुक्त देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेप्रकरणी भारतात गैरसमज पसरवण्यात येत असल्याचा आरोप भारतीय वंशाचे मॅनहॅटनचे अ‍ॅटर्नी प्रीत भरारा यांनी केला आहे. देवयानी यांना अटक करतेवेळी त्यांना बेडय़ा ठोकण्यात आल्या नव्हत्या की त्यांची अंगझडतीही घेण्यात आली नव्हती असे भरारा यांनी स्पष्ट केले आहे.
देवयानी यांच्या अटकेवरून भारतात निर्माण झालेले वादंग व केंद्र सरकारने स्वीकारलेले आक्रमक धोरण या पाश्र्वभूमीवर भरारा यांनी गुरवारी प्रथमच या प्रकरणी बोलताना अमेरिकी न्यायव्यवस्थेची बाजू मांडली. या प्रकरणावरून भारत आणि अमेरिका यांच्यात राजनैतिक पातळीवर निर्माण झालेल्या वाद चिघळू नये म्हणून भरारा यांनी ही बाजू मांडली आहे. ते म्हणाले की, खोब्रागडे यांना त्यांच्या गैरवर्तणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये, घरगुती कामे करण्यासाठी विविध देशांच्या दूतावासामधील व्यक्तींकडून नेमण्यात येणाऱ्या मदतनीसांचे शोषण होऊ नये म्हणून अत्यंत कठोर कायदे आहेत. त्या कायद्यांचे उल्लंघन केल्यामुळे खोब्रागडे यांना अटक झाली. शिवाय त्यांनी केवळ कायद्याचा भंग केला असे नव्हे तर, तर संबंधित महिला कर्मचारी आणि तिचे पती यांच्याकडून खोडय़ा कागदपत्रांच्या प्रती साक्षांकित करून घेतल्या. तसेच अमेरिका सरकारला दिशाभूल करणारा तपशील पुरविला.
भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे एव्हढा गजहब होत असताना, ज्या भारतीय कर्मचारी महिलेची खोब्रागडे यांनी इतकी फसवणूक केली, तिच्याबद्दल कोणालाच कणव कशी काय येत नाही, असा सवालही भरारा यांनी केला.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताने सुनावले
भरारा हे भारतीय न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करत असून त्यांनी अमेरिकेची केलेली मखलाशी स्वार्थी आहे. राजनैतिक दर्जाच्या अधिकाऱ्याला असलेल्या विशेषाधिकारांचे उल्लंघन अमेरिकेने केले असून व्हिएन्ना परिषदेतील कराराचाही भंग केला असल्याचे भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सुनावले आहे.

अमेरिकेत कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. एखादी व्यक्ती उच्चपदस्थ आहे किंवा श्रीमंत आहे अथवा त्या व्यक्तीचे उच्चपदस्थांशी संबंध आहेत म्हणून तिला कायद्यातून सूट दिली जात नाही. प्रीत भरारा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Statement of manhattan us attorney preet bharara on devyani khobargade