युक्रेन व रशियाबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे मायदेशी तसेच परदेशातही टीकेचा सामना करावा लागल्याने जर्मन नौदलाच्या प्रमुखांनी शनिवारी उशिरा राजीनामा दिला.
रशियाने २०१४ साली जे क्रिमिया द्वीपकल्प ताब्यात घेतले, ते युक्रेन परत मिळवू शकणार नाही, असे शुक्रवारी भारतातील एका कार्यक्रमात बोलताना व्हाइस अॅडमिरल के- आचिम शोएनबाख म्हणाले होते.
चीनच्या विरोधात रशिया एकाच बाजूला असणे महत्त्वाचे असल्याचे सांगतानाच, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे ‘आदर’ मिळण्यास पात्र आहेत, असे मत शोएनबाख यांनी व्यक्त केले होते. व्हिडीओ चित्रित झालेल्या त्यांच्या या शेरेबाजीमुळे युक्रेनमध्ये संताप उसळला आणि त्या देशाने जर्मन राजदूताला पाचारण करून निषेध नोंदवला. जर्मनीतही शोएनखाब यांच्या वक्तव्यांमुळे अस्वस्थता निर्माण होऊन त्यांची कानउघाडणी करण्यात आली.
आपल्या ‘अयोग्य’ वक्तव्यांमुळे जर्मनी व त्याच्या लष्कराचे आणखी नुकसान रोखण्यासाठी आपल्याला पदच्युत करावे, असे शोएनखाब यांनी शनिवारी उशिरा सांगितले. संरक्षणमंत्री ख्रिस्टिन लांब्रेख्ट यांनी शोएनखाब यांचा राजीनामा स्वीकारला असून, नौदल उपप्रमुखांची प्रभारी नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे, असे जर्मन नौदलाने एका निवेदनात सांगितले.
रशियापासून युक्रेनला असलेल्या लष्करी धोक्याच्या मुद्दय़ावर आपण ‘नाटो’ मित्रराष्ट्रांसोबत आहोत असे जर्मन सरकारने आवर्जून सांगितले होते. रशियाने त्याच्या शेजारी राष्ट्राविरुद्ध लष्करी कारवाई केल्यास त्याला फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही जर्मनीने दिला होता. मात्र आपण युक्रेनला प्राणघातक शस्त्रे पुरवणार नाही, अशी भूमिका त्या देशाने घेतली आहे.