नवी दिल्ली : सौरऊर्जा प्रकल्पातील महागडे वीज खरेदी करण्यासाठी काही राज्यांतील सरकारी अधिकाऱ्यांना उद्योजक गौतम अदानी यांनी लाच दिल्याचा आरोप झाल्यानंतर या राज्यांनी हे आरोप फेटाळले. याप्रकरणी करण्यात आलेले आरोप असत्य आणि तथ्यहीन असल्याचे या राज्यात तत्कालीन सत्तेवर असलेल्या पक्षांच्या नेत्यांनी सांगितले.
ओडिशामध्ये २००० ते जून २०२४ मध्ये सत्तेवर असलेल्या बिजू जनता दलानेही (बीजेडी) हे आरोप फेटाळून लावले.
बीजेडी सत्तेवर असताना ओडिशामधील सरकारी अधिकाऱ्यांनी अदानी उद्याोग समूहाकडून लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र ओडिशातील अधिकाऱ्यांवर झालेले आरोप खोटे असून वस्तुस्थितीवर आधारित नाहीत, असे ओडिशाचे माजी ऊर्जामंत्री आणि बीजेडीचे आमदार पी. के. देब यांनी सांगितले.
हेही वाचा >>> Gautam Adani Fraud: “आम्ही या प्रकरणातून मार्ग काढू…”; गौतम अदणींवरील आरोपांवर अमेरिकेची प्रतिक्रिया
गौतम अदानींना तात्काळ अटक करा : खरगे
उद्याोजक गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेने लाचखोरीचा आरोप केल्याने त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. संसदेच्या आगामी अधिवेशनात काँग्रेस हा मुद्दा उपस्थित करेल आणि आरोपांची चौकशी करण्याची मागणी करेल सरकारला सर्व काही माहीत आहे. मात्र कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे, असे खरगे म्हणाले.
तथ्य आढळल्यास कारवाईआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू यांनी अमेरिकेतील आरोपपत्र अहवालांचा अभ्यास करू असे सांगितले. आरोपपत्रांचा अभ्यास केल्यानंतर त्यात तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन नायडू यांनी दिले.