गेल्या काही वर्षांमध्ये थोर व्यक्तिंप्रती कृतज्ञ राहण्यासाठी त्यांची स्मारके उभारण्याचा कल वाढला आहे. या स्मारकांच्या किमती काही कोटींपासून काही हजार कोटींपर्यंत आहेत. गाजावाजा झालेल्या काही स्मारकांचा आढावा घेतला असता, जवळपास आठ ते १० हजार कोटी रुपयांचा खर्च थोरामोठांच्या स्मारकासाठी करण्यात आल्याचे वा संकल्प करण्यात आल्याचे दिसून येते. काही निवडक स्मारके व त्यांचा संभाव्य खर्च पुढीलप्रमाणे:
>
जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचं काम पूर्ण करण्यासाठी २ हजार ९८९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. २७ ऑक्टोबर २०१४ रोजी लार्सन अॅण्ड टुब्रोने या मुर्ती बांधणीचे कंत्राट मिळवले होते. अडीच हजार कामगार, २०० इंजिनिअर्सने आपले कौशल्य पणाला लावून हा पुतळा साकारला आहे. यामध्ये चिनी कामगार आणि इंजिनिअर्सचाच भरणा अधिक होता.
>
अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असलेले देखणे स्मारक साकारण्यासाठी तब्बल ३६०० कोटी खर्च केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २४ डिसेंबर २०१६ रोजी स्मारकाचे जलपूजन करण्यात आले आहे. संपूर्ण ३६०० कोटी किंमतीच्या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा सुमारे २६०० कोटी रुपयांचा असणार आहे. पहिल्या टप्प्यात पुतळा, जेट्टी, हेलिपॅड, स्मारकाची तटबंदी, तुळजाभवानी मंदिर, रेस्टोरंट, हॉस्पिटल अशी प्रमुख कामे केली जाणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात शिवाजी महाराज यांच्या जन्मापासूनचे राज्याभिषेकापर्यंत घटना दाखवणारे प्रत्यक्ष जिवंत देखावे साकारले जाणार आहेत. शिवकाल उलगडवून दाखवणारे मोठे कला संग्रहालय आणि ग्रंथालयही स्मारकात असणार आहे. तसंच अँपीथीअटर, साउंड अँड लाईट शो, थ्री डी आयमॅक्स थिएटर बरोबरच अत्यंत आकर्षक असे मत्सालय या ठिकाणी असेल. राजभवनापासून जवळच असणाऱ्या समुद्रातील १५.९६ हेक्टर बेटावर जगातील सर्वात उंच असे हे स्मारक असेल.
>
२०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या लंडन येथील घराच्या खरेदीची प्रक्रिया पुर्ण केली. सरकारने ३१ कोटी ३९ लाख रुपयांत घराची खरेदी करत लंडनमधील हे घर ताब्यात घेतले. लंडनमधील आंबेडकर निवास खरेदी करून त्याचे स्मारकात रूपांतर करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर आणि त्यासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती त्यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ नोव्हेंबर २०१५ रोजी या स्मारकाचे उद्घाटन केले.
>
इंदू मिल परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक ६ डिसेंबर २०२० पूर्वी उभारले जाईल, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सप्टेंबर २०१८मध्ये दिली. या स्मारकासाठी ७४३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. इंदू मिल येथील ४८४१४.८३ चौरस मीटर जागेवर हे स्मारक अस्तित्वात येणार आहे. या स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा हा ३५० फुटांचा असेल. या स्मारकात ग्रंथालय, ई-लायब्ररी विपश्यना केंद्र, सभागृह उभारण्यात येणार आहे.
>
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी आपल्या कार्यकाळात ७०० कोटी रुपये खर्च करुन राष्ट्रीय दलित प्रेरणा स्थळ नावाचे स्मारक उभारले आहे. २०११ मध्ये या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्याबरोबर या ठिकाणी मायावतींचाही पुतळा उभारण्यात आला आहे. लखनौमध्ये मायावतींचे ९ आणि पक्षाचे चिन्ह असणाऱ्या हत्तींचे चक्क १५६ पुतळे आहेत. २००९ साली तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पुतळे उभारण्यावरून मायावतींवर टिका केली होती. बसपचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तीचे व स्वत:चे पुतळे उभारण्यासाठी मायावती यांनी एक हजार कोटी रुपये खर्च करणे ही गोष्ट भारतीय राजकारणासाठी शरमेची बाब आहे, असे सांगतानाच चिदंबरम यांनी एक हजार कोटी रुपये खर्च करून उत्तर प्रदेशात उभारलेल्या या पुतळय़ांचा काय उपयोग आहे असा सवाल उपस्थित केला होता. हाच पैसा गरीब लोकांना शिक्षण, मूलभूत सुविधा देण्यासाठी वापरता आला असता असेही चिदंबरम म्हणाले होते. २०१६ मध्ये उत्तर प्रदेशात सत्तेत आल्यास पुतळे उभारणे किंवा स्मारके उभारण्याऐवजी विकासाचे राजकारण केले जाईल, असे बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी स्पष्ट केले. मात्र मायावतींच्या पुतळ्यांसमवेत इतर राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांवर त्यांच्या कार्यकाळात १५०० कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले.
>
राजस्थानमध्ये जयपूरपासून ३५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दूर धानक्या येथे पंडित दीनद्याल उपाध्याय यांचे स्मारक साकारण्यात आले आहे. काही आठवड्यांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले. या स्मारकामध्ये दीनद्याल उपाध्याय यांची १५ फुटांची अष्ठधातूची मुर्ती आहे. राजस्थान सरकारने ४४०० वर्ग मीटर क्षेत्रफळ असणारे हे स्मारक उभारण्यासाठी १२ कोटी रुपये खर्च केले आहेत.
>
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त आज तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्मारकाचं उद्घाटन केलं. विशेष म्हणजे या स्मारकात कलाम यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. डीआरडीओने या स्मारकाचे बांधकाम केले आहे. या स्मारकासाठी १५ कोटी रुपये खर्च करण्यात आला.
>
अटल बिहारी वाजपेयी कायम देशासाठी जगले. सत्तेत असू किंवा नसू त्यांनी नेहमीच देशाच्या भल्याचा विचार केला. राष्ट्रीय धोरणांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले, अशा महान नेत्याच्या विचारांचे योग्य स्मारक मुंबईत उभारले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत मुंबईमध्ये बोलताना केली. या स्मारकाचे स्वरूप कसे असेल त्यासाठी किती खर्च येईल याबद्दल कोणतीही माहिती अद्याप जाहीर केलेली नाही.
>
ठाणे येथील तीन हात नाका परिसरातील इटरनिटी मॉलच्या शेजारीच असलेल्या आरक्षित जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे दहा कोटी ७३ लाख रुपये खर्च येणार आहे. या स्मारकाचा ढोबळ आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार येत्या दोन वर्षांत या स्मारकाचे काम पूर्ण होणार आहे. याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये बाळासाहेबांचे पुतळे बांधण्याची योजना स्थानिक महानगरपालिकांनी व्यक्त केली आहे.
>
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र असे असले तरीही पालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात काहीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही.
>
सध्या शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाच्या कामात लाखोंचा घोटाळा झाल्याची बाब सकृतदर्शनी उजेडात आली आहे. उद्यान विकसित करण्याचे काम देण्यात आले त्यांनी पालिकेला दिलेल्या बिलामध्ये झाडांसाठी लावलेल्या किमतीतच चार लाख रुपये जादा उकळल्याचे आढळून आले आहे. सर्व झाडांची एकत्रित किंमत एक लाख ३४ हजार रुपये एवढी होते. प्रत्यक्षात निसर्ग नर्सरीने पालिकेला दिलेल्या बिलामध्ये पाच लाख ८५ हजार ५९४ रुपये किंमत लावण्यात आलेली आहे. एकीकडे ही स्थिती असतानाच राज्य सरकारने बाळासाहेबांच्या स्मारकासाठी पैसे देणार नसल्याचे जाहीर केले आहे.