दिल्ली सरकार भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचे पुतळे राज्य विधानसभेच्या आवारात बसवणार असून या तीन हुतात्म्यांनी देशासाठी जे कार्य केले त्यांच्या माहितीचा समावेश अभ्यासक्रमात केला जाणार आहे. हे पुतळे आमदारांच्या वेतनातून पैसे घेऊन उभारले जाणार आहेत.
विधानसभा आवारात या तिघांच्या हुतात्मा दिनानिमित्त उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी सांगितले की, आमदारांनी त्यांच्या वेतनातून पुतळे उभे करण्यासाठी पैसे द्यावेत. करदात्यांचा पैसा वापरून पुतळे उभारले जाणार नाहीत. त्यासाठी आपण आमदारांना त्यांच्या वेतनातून हप्त्याने पैसे देण्याचे आवाहन करीत आहोत. या पुतळ्यांमुळे सर्वामध्ये देशभक्तीची भावना रुजेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
या पुतळ्यांना किती खर्च येईल याचा अंदाज आपण सभापतींना व सचिवालय अधिकाऱ्यांना घेण्यास सांगितले आहे. त्यानंतर आमदारांकडून पैसे घेतले जातील असे शिसोदिया म्हणाले.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले की, सभापतींनी विधानसभेच्या आवारात तिघांचे पुतळे बसवण्याचा प्रस्ताव मांडला व तो आम्ही मान्य केला आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या स्वार्थत्यागाची भावना लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये रुजावी हा हेतू त्यात आहे. शिक्षण मंत्र्यांना आपण शालेय अभ्यासक्रमातही या थोर देशभक्तांच्या कार्याची माहिती समाविष्ट करण्यास सांगितले आहे. भगतसिंग  यांची माहिती मुलांना लहानपणापासून दिली पाहिजे असे आपल्याला वाटते.
शहीद दिनाव्यतिरिक्त हा दिवस देशदिन म्हणूनही पाळण्यात यावा असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.  केवळ या क्रांतिकारकांना पुष्पांजली वाहून काम भागणार नाही असे केजरीवाल यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा