लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेच्या आवारातील महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बिरसा मुंडा, महाराणा प्रताप अशा अनेक महापुरुषांचे पुतळे सौंदर्यीकरणाच्या नावाखाली मूळ जागेवरून हटवण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाच्या या वादग्रस्त निर्णयामुळे संसदेतील पुतळेही ‘मार्गदर्शक मंडळा’त सामील करण्यात आल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.
नव्या संसदेच्या ‘गज द्वारा’तून पंतप्रधान संसदभवनामध्ये प्रवेश करतात. त्यांचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी या द्वारासमोरील संपूर्ण जागेचे सुशोभीकरण केले जात आहे. त्यामुळे या परिसरातील सगळे पुतळे जुन्या संसदभवनाच्या द्वार क्रमांक पाचच्या समोर उभे केले गेले आहेत. या स्थलांतरणामुळे महापुरुषांचे पुतळे नव्या संसदेसमोरून बाजूला गेले असून ते अडगळीत पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा >>>सर्वात मोठा शेअर बाजार घोटाळा; संसदीय समिती चौकशीची मागणी; राहुल यांचा मोदी-शहांवर हल्लाबोल
जुन्या इमारतीच्या कोपऱ्यात?
पूर्वी महात्मा गांधींचा पुतळा जुन्या संसदभवनाच्या प्रवेशद्वारासमोर होता, संसदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामामुळे तिथून हलवण्यात आला व जुन्या संसदभवनाच्या द्वार क्रमांक २ व ४ या दरम्यान असलेल्या समोरील भागांत पुनर्स्थापित केला गेला. त्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर व महात्मा फुलेंचे पुतळे होते.
बिरसा मुंडा, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यांसह सर्व पुतळे आता एकाच ठिकाणी म्हणजे जुन्या संसद भवनाचे द्वार क्रमांक-पाच आणि संसदेचे ग्रंथालय यांच्यामधील मोकळ्या जागेत उभे करण्यात आले आहेत. या द्वार क्रमांक पाचमधून पंतप्रधान संसदभवनात प्रवेश करत असत. आता जुन्या संसदभवनाचे रुपांतर संविधान सदनामध्ये करण्यात आले असून तिथे पंतप्रधान वा खासदार जातात. नव्या संसद इमारतीमध्ये अधिवेशन भरवले जात असल्यामुळे जुन्या इमारतीभोवतीच्या परिसराचे महत्त्व तुलनेत कमी झाले आहे.
आता नवे प्रेरणा स्थळही!
संसदेच्या आवारात सुशोभीकरण केले जात असून संसदेच्या उच्च प्रतिष्ठेला व सजावटीला अनुसरून संकुल अधिक भव्य व आकर्षक बनवले जात आहे. संसद संकुलात विविध ठिकाणी देशातील महान नेते, स्वातंत्र्यसैनिकांचे पुतळे बसवण्यात आले. पर्यटकांना हे पुतळे नीट पाहता येत नाहीत. म्हणून सर्व पुतळे संसद भवन परिसरातच एकत्रित पाहता यावेत या उद्देशाने ते एकाच ठिकाणी उभे करण्यात आले आहेत. या ठिकाणाला ‘प्रेरणा स्थळ’ असे संबोधले जाईल, असे लोकसभा सचिवालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
लोकसभा सचिवालयाचे स्पष्टीकरण
पुतळे हटवण्याच्या कृतीवर लोकसभा सचिवालयाने रात्री उशिरा स्पष्टीकरणाचे निवेदन प्रसिद्ध केले. संसद भवनाचा परिसर लोकसभाध्यक्षांच्या अखत्यारीत येतो. यापूर्वीही तत्कालीन लोकसभाध्यक्षांच्या परवानगीने पुतळे संकुलाच्या आत हलवण्यात आले होते. संसद भवनाच्या संकुलातून कोणत्याही महापुरुषाचा पुतळा हटवण्यात आलेला नाही. संसद भवन परिसरात त्यांचे पुतळे योग्य रितीने व सन्मानीयरित्या बसवले जात आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे.
काँग्रेसची टीका
लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयावर काँग्रेसने तीव्र टीका केली. ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांचे पुतळे संसद भवनासमोरील त्यांच्या मूळ स्थळांवरून हटवण्याची कृती अत्यंत क्रूर आहे, अशी टीका काँग्रेसचे माध्यमविभाग प्रमुख जयराम रमेश यांनी केली. महाराष्ट्रातील मतदारांनी भाजपला मतदान केले नाही, आता शिवाजी महाराज, आंबेडकरांचे पुतळे संसदेतील त्यांच्या मूळ जागेवरून हटवण्यात आले. गुजरातमध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकता न आल्याने भाजपने महात्मा गांधींचा पुतळा हटवला… जरा विचार करा, भाजपला ४०० जागा मिळाल्या असत्या तर त्यांनी संविधानाचे काय केले असते?, असा प्रश्न उपस्थित करत पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनीही भाजपवर टीका केली.