Steve Jobs letter expressing wish to attend Kumbh Mela auctioned : जगप्रसिद्ध स्मार्टफोन बनवणारी कंपनी अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी १९७४ साली वयाच्या १९ व्या वर्षी लिहिले पत्र सध्या चर्चेत आले आहे. जॉब्स यांनी लिहीलेल्या या पत्राला एका लिलावत ५००,३१२ डॉलर्स म्हणजेच सुमारे ४.३२ कोटी रुपयांची किंमत मिळाली आहे. स्टीव्ह जॉब्स यांनी हे पत्र त्यांचा बालपणीचा मित्र टीम ब्राउन याला लिहीले होते. ज्यामध्ये जॉब्स यांनी भारतातील कुंभ मेळ्यात जाण्याची त्यांची इच्छा व्यक्त केली होती.

स्टीव्ह जॉब्स यांच्या वाढदिवसाच्या थोडीशी आधीची तारीख असलेल्या या पत्रात, जॉब्स यांनी कुंभमेळ्याला उपस्थित राहण्याची त्यांची इच्छा आपल्या मित्राकडे व्यक्त केली होती. “मला एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी भारतात जायचे आहे. मी मार्चमध्ये कधीतरी निघणार आहे, अजून निश्चित नाही”, असं त्यांना आपल्या पत्रात लिहिलं आहे.

स्टीव्ह जॉब्स यांनी लिहीलेले पत्र

भारत भेटीवेळी स्टीव्ह जॉब्स हे नीम करोली बाबा यांच्या उत्तराखंड येथील आश्रमात गेले होते. नीम करोली बाबा यांच्या निधनानंतर जॉब्स भारतात आले होते. या भेटीवेळी ते कैंची धाम येथे राहिले होते. या सात महिन्यांच्या कालावधीत जॉब्स यांनी स्वत:ला भारतीय संस्कृती आणि अध्यात्मात बुडवून घेतले होते.

यंदा उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महा कुंभमेळा होत आहे. हा पूर्ण कुंभ मेळा दर १२ वर्षांनी आयोजित केला जातो. स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स यादेखील यंदाच्या कुंभ मेळ्यात सहभागी झाल्या होत्या. लॉरेन पॉवेल यांना त्यांचे अध्यात्मिक गुरू कैलाशानंद गिरी यांनी कमला असं नाव दिलं आहे. भारत भेटीदरम्यान अॅलर्जीचा त्रास होत असून देखील लॉरेन यांनी गंगा स्नान विधीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या भारत भेटीची माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा झाली.

कुंभ मेळा काय असतो?

यंदा उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महा कुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दर १२ वर्षांनी होणाऱ्या या मेळ्याला पूर्ण कुंभ असेही म्हणतात. जगभरातील भाविकांचीा सर्वात मोठा मेळा असतो. यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक गोळा होतात. या पवित्र कालावधीत नद्यांमध्ये स्नान केल्याने पापांची शुद्धी होते आणि आध्यात्मिक पुण्य मिळते अशी या भाविकांची धारणा असते.

कुंभ मेळ्याची सुरुवातीबद्दल बोलायचे झाल्यास, याची सुरूवात ही पौराणिक कथा, इतिहास आणि श्रद्धा यांच्या मिश्रणात आढळते. हिंदू पौराणिक कथेनुसार देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्र मंथनामधून निघालेले अमृत हे पृथ्वीवर चार ठिकाणी सांडले- हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर, जिथे आता हा उत्सव साजरा केला जातो.

Story img Loader