Steve Jobs’ Wife Allergies : ॲपल कंपनीचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स या सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान त्यांनी वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर निरंजनी आखाड्याचे स्वामी कैलाश नंदगिरी महाराजही होते. भारतीय पारंपरिक पोशाखात लॉरेन यांनी मंदिरात हजेरी लावली. स्वामी कैलाश नंदगिरी यांनी लॉरेन यांना ‘कमला’ असे नावही दिले आहे.
दरम्यान प्रयागराज येथे सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्याचा दुसऱ्या दिवशी अॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स यांना ऍलर्जी झाली, असे असले तरी, त्या गंगा नदीतील स्नान विधीत सहभागी होणार आहेत.
लॉरेन पॉवेल जॉब्स यांना ऍलर्जी
निरंजनी आखाड्याचे स्वामी कैलाशानंद गिरी यांनी मंगळवारी एएनआयला सांगितले की, “त्या (संगम येथे) स्नान विधीत सहभागी होणार आहेत. लॉरेन पॉवेल जॉब्स सध्या माझ्या शिबिरात विश्रांती घेत आहेत. त्यांना ऍलर्जी झाली आहे. यापूर्वी कधीही त्या इतक्या गर्दीच्या ठिकाणी गेलेल्या नाहीत. त्या अगदी साध्या आहेत.”
१४४ वर्षांनंतर घडणाऱ्या दुर्मिळ खगोलीय घटनेचे दर्शन घडवणाऱ्या महाकुंभाला उपस्थित राहण्यासाठी जॉब्स सोमवारी प्रयागराज येथे पोहोचल्या होत्या. गिरी यांनी लॉरेन पॉवेल जॉब्स यांना महाकुंभसाठी आल्यानंतर ‘कमला’ असे नाव दिले आहे. त्या १५ जानेवारीपर्यंत निरंजिनी आखाड्या शिबिरातील कुंभ तंबूत राहतील आणि २० जानेवारी रोजी अमेरिकेत होणाऱ्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेला जातील.
जॉब्स कुटुंबाचे भारतीय आध्यात्माशी जुने नाते
लॉरेन जॉब्स त्यांच्या ६० सहकाऱ्यांसह रविवारी प्रयागरजाचा दौरा करत आहेत. तसेच येथील अमृत (शाही) स्नानातही त्या सहभागी होणार आहेत. जॉब्स कुटुंबाचे भारतीय आध्यात्माशी जुने नाते आहे. याआधी स्टीव्ह जॉब्स यांनीही भारताचा दौरा केला होता. १९७० च्या दशकात जवळपास सात महिने त्यांनी भारतात वास्तव्य केल्याचे बोलले जाते.
२६ फेब्रुवारीपर्यंत महाकुंभ मेळा
प्रयागराज हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. सध्या प्रयागराजमध्ये दुर्मीळ महाकुंभ मेळ्याची तयारी सुरु आहे. हा मेळा १३ जानेवारीपासून सुरू होऊन २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असलेला हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मात्र, यावेळी तो अधिक विशेष आहे, कारण १४४ वर्षांनंतर होणाऱ्या दुर्मीळ ग्रहस्थितीमुळे या कुंभमेळ्याला आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.