नक्षलवाद्यांनी जमुई जिल्ह्यात विशेष कृती दलाच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आणि अन्य दोघे जण जखमी झाले. नक्षलवाद्यांनी डोंगराच्या माथ्यावरून शुक्रवारी पहाटे जवानांवर निशाणा साधला. जमुई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जितेंदर राणा यांनी ही माहिती दिली. अन्शुकुमार असे शहीद झालेल्या जवानाचे नाव असून, अजयकुमार आणि सुमनकुमार जखमी झाले आहेत.
नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाची बांधकाम सुरू असलेली इमारत बुधवारी रात्री उडवून दिली. सशस्त्र नक्षलवाद्यांनी पारसी गावातील या इमारतीमध्ये स्फोट घडवून आणले. ही घटना घडल्याचे समजल्यावर पोलीस अधीक्षकांसह अन्य अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी विशेष कृती दलाच्या जवानांनी बारीबाग गावापासून जंगलातील मार्गाने पायी जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी गिधेश्वर डोंगराजवळ नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. एकूण तीन जवानांना गोळ्या लागल्या. त्यापैकी एका जवानाचा मृत्यू झाला असून, अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत.

Story img Loader