जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो याचे पॅरिस येथून चोरण्यात आलेले चित्र आता न्यूयॉर्क येथे सापडले असून ते फ्रेंच सरकारला परत देण्यात येईल, असे अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले.
१०० वर्षांपूर्वीचे हे चित्र बेल्जियममधून तस्करीने अमेरिकेत आणण्यात आले. हँडीक्राफ्ट हॉलिडे नावाने ते पाठवण्यात आले व ३० युरोला ते घेण्यात आले. या चित्राचे नाव ला कॉफ्यूज किंवा द हेअरड्रेसर असे आहे, त्याची किंमत लाखो डॉलर आहे असे अमेरिकेच्या अभियोक्तयांनी सांगितले.
अमेरिकेच्या सीमा शुल्क विभागाने हे चित्र जप्त करण्याची कारवाई केली. हरवलेला खजिना सापडला, असे न्यूयॉर्क जिल्ह्य़ाच्या अभियोक्ता लोरेटा लिंच यांनी सांगितले. या चित्राची तस्करी झाली असून ते आता अमेरिकेने जप्त केले आहे अन्यथा ते काळ्या बाजारात विकले गेले असते, आता ते योग्य मालकाकडे पोहोचवले जाईल, असे त्यांनी सांगितले.
हे चित्र १९११ मधील असून कॅनव्हासवर तैलरंगाने काढलेले १३ बाय १८ इंचाचे हे चित्र असून ते पॅरिस येथे संग्रहालयात ठेवले होते. जर्मनीत म्युनिच येथे ते प्रदर्शनात मांडले गेले होते. २००१ मध्ये ते हरवल्याचे लक्षात आले.