गुजरातच्या वडोदरा येथील भुतलीझापा परिसरात रामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाकडून संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षीही रामनवमीच्या दिवशी या भागात अशाच प्रकारे शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली होती.
एनएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, वडोदराच्या भुतलीझापा परिसरात रामनवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. ही शोभायात्रा मशिदीसमोरून जात असताना अचानक दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत कोणालाही इजा झाली नसून परिसरातील चारचाकी गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच वडोदरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच या भागात तणावपूर्ण शांतता बघायला मिळत आहे. याबरोबरच आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याची माहिती आहे.