भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबरांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर गदारोळ झाला. यावेळी दोन समाजांमध्ये तुफान दगडफेक करण्यात आली. त्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कानपूरच्या दौऱ्यावर आहेत. पोलिसांनी काही स्थानिकांवर लाठीमार केल्यानंतर यतिमखानाजवळील बेकोनगंज भागात हिंसाचार झाला. या निषेधार्थ शेकडो लोक रस्त्यावर उतरले.
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरुन कानपूरमध्ये मुस्लिम बहुल लोकसंख्या असलेल्या भागात व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तात शुक्रवारची नमाज अदा करण्यात आली. यानंतर यतिमखाना येथील सद्भावना चौकीजवळ दोन्ही समाजातील लोक समोरासमोर आले. जमाव जमल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवले. त्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली. लोक अरुंद रस्त्यावर उतरले आणि दगडफेक करू लागले.
जोहर फॅन्स असोसिएशन आणि इतर मुस्लिम संघटनांनी शुक्रवारी मुस्लिम समाजाला व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याचा व्यापक परिणाम दिसून आला. सकाळपासून चमनगंज, बेगनगंज, तलाक महल, कर्नलगंज, हिरामण पूर्वा, दलेल पूर्वा, मेस्टन रोड, बाबू पूर्वा, रावतपूर आणि जाजमाऊ या भागात बंद दिसून आला.
दरम्यान, भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. इंग्रजी वृत्त वाहिनीवरील चर्चासत्रात धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये केल्याचा आरोप असून याप्रकरणी रझा अकादमीने पायधुनी पोलिसांकडे तक्रार केली होती. नूपुर शर्मा या दिल्ली भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या सदस्या, तसेच पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत. एका इंग्रजी वृत्तवाहिनीवर ज्ञानव्यापी मशीद प्रकरणाबाबत शनिवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रादरम्यान शर्मा यांनी आक्षेपार्ह विधान करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप रझा अकादमीने करून मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती.