दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार यांच्या गाडीवर गुरुवारी नागपूरमधील विमातळाबाहेर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत कन्हैया कुमारला घेऊन निघालेल्या गाडीचे नुकसान झाले असून, तो सुखरूप आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याची माहिती मिळाली असून, पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कन्हैया कुमार गुरुवारी नागपूरमध्ये आला आहे. शहरातील धनवटे राष्ट्रीय महाविद्यालयात दुपारी त्याची जाहीर सभा होणार आहे. कन्हैया कुमार विमानतळावर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह इतर डाव्या विचारांच्या सामाजिक संघटनांच्या जवळपास १०० कार्यकर्त्यांनी मानवी कडे करून त्याला विमानतळाच्या बाहेर आणले. त्यानंतर तो ज्या गाडीमध्ये बसला. त्यावरच दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना घटनास्थळीच ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांच्या सुरक्षेतच कन्हैया कुमार रविभवनकडे रवाना झाला. रविभवनमध्ये काही भेटीगाठी झाल्यावर तो दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन करणार आहे. त्यानंतर त्याची जाहीर सभा होणार आहे.

Story img Loader