Stone Pelting on Vande Bharat Express : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे रविवारी वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. यामुळे डब्याच्या खिडकीचा चक्काचूर झाला आहे. ही ट्रेन गोरखपूरहून लखौनला जात होती. महत्त्वाचं म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाचा कार्यक्रम सुरू असताना हा प्रकार घडला.
भारतीय रेल्वेने देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत (ABSS) स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (६ ऑगस्ट) ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासाच्या कामांची व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे पायाभरणी केली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे बाराबंकी येथील सफेदाबाद रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. सकाळी १०.४० वाजता ही ट्रेन लखनौला पोहोचली.
याप्रकरणी बाराबंकीच्या रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात तपास सुरू केला आहे. सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
रेल्वे सुरक्षा दल (RPF) एस्कॉर्ट टीमने नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या आरपीएफ निरीक्षकांना घटनास्थळी कोणतेही अनियंत्रित घटक किंवा साक्षीदार आढळले नाहीत. गेल्या महिन्यात अयोध्येत वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाली होती.