दोन मिनिटांत तयार होणाऱ्या आणि झटपट भूक भागवणाऱ्या म्हणून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या मॅगी नूडल्स आरोग्यास अपायकारक असल्याचे दिसून आले आहे. ‘अन्नसुरक्षा आणि औषध प्रशासन’ (एफएसडीए) या संस्थेने उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथून गोळा केलेल्या मॅगीच्या नमुन्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त शिसे (लेड) आणि मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) नावाचे रसायन आढळून आले.
‘एफएसडीए’ने लखनऊ येथून गोळा केलेले मॅगीचे नमुने कोलकाता येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. त्यात प्रमाणित मात्रेपेक्षा अधिक शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेट आढळल्याची माहिती ‘एफएसडीए’चे साहाय्यक आयुक्त विजय बहादूर यादव यांनी दिली. मॅगीच्या एक दशलक्ष भागांमध्ये १७ भाग इतके (पार्ट्स पर मिलियन -पीपीएम) शिसे आढळून आले. प्रमाणित मात्रा ०.०१ पीपीएम इतकी आहे. तपासणीदरम्यान मॅगीत वरून जादा मोनोसोडियम ग्लुटामेट मिसळल्याचे दिसून आले.
या संदर्भात मायो क्लिनिकच्या सूत्रांनी सांगितले की, मोनोसोडियम ग्लुटामेट हे शक्यतो चायनीज खाद्यपदार्थामध्ये, तसेच डबाबंद भाज्या, सूप आणि मटण यामध्ये चव सुधारण्यासाठी वापरले जाते. ठरावीक प्रमाणात वापरल्यास ते आरोग्यास हानीकारक नाही. पण प्रमाणाबाहेर वापरल्यास त्याने डोकेदुखी, घाम येणे, चेहरा व त्वचेचा दाह होणे, अन्नावरील वासना उडणे व अशक्तपणा असे परिणाम दिसतात.

नेस्लेला आश्चर्य..
’या चाचण्यांबाबत नेसले कंपनीच्या प्रवक्त्याने आश्चर्य व्यक्त करत सांगितले की, आमच्या उत्पादनात १ टक्क्यापेक्षा कमी मोनोसोडियम ग्लुटामेट आहे.
’जर तपासलेल्या नमुन्यांमध्ये ते अधिक प्रमाणात दिसले असेल तर जादाचे एमएसजी नैसर्गिक स्रोतांमधून आलेले असावे. प्रवक्त्याने भारतात एमएसजीच्या वापराबाबत ठरावीक मानके घालून दिली नसल्याचेही सांगितले.

अधिक प्रमाणात आणि दीर्घ काळासाठी मोनोसोडियम ग्लुटामेटचे सेवन केल्यास रक्तदाब वाढतो आणि चेतासंस्थेवरही घातक परिणाम होतात, असे नवी दिल्लीतील फोर्टिस हॉस्पिटलमधील आहारतज्ज्ञ डॉ. सिमरन सैनी यांनी सांगितले.

Story img Loader