Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय रोड काँग्रेसच्या कार्यपद्धीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भारतीय रोड काँग्रेस ही ९० वर्षे जुनी संघटना आहे. या संघटनेतील लोकांकडे प्रचंड ज्ञान आहे. मात्र ही संघटना एखाद्या राजकीय पक्षासारखं काम करते आहे. या संघटनेने आता राजकीय पक्षासारखं काम करणं बंद करावं आणि संशोधनावर लक्ष केंद्रीत करावं, असं ते म्हणाले. नितीन गडकरी गुरुवारी बंगळुरू येथे आयोजित ‘ॲडव्हान्सेस इन ब्रीज मॅनेजमेंट’ या विषयावरील एक चर्चासत्र सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी भारतीय रोड काँग्रेसवर टीका केली.
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?
“भारतीय रोड काँग्रेस ही देशातली एक महत्त्वाची संघटना आहे. या संघटनेतील लोकांकडे प्रचंड ज्ञान आहे. मात्र, कधी कधी मला असं वाटतं की ही संघटना राजकीय पक्षांसारखं काम करते. खरं तर या संघटनेकडे स्वत:चं कार्यालय आणि प्रयोगशाळा असायला हवी. तसेच ज्या लोकांना तंत्रज्ञानात रुची आहे, अशा लोकांची नियुक्ती करून त्यांनी संशोधनावर लक्ष केंद्रीत करावं”, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांन यांनी दिली.
“भारतीय रोड काँग्रेसने स्वतंत्र, निष्पक्ष संघटना म्हणून काम करावं”
यावेळी बोलताना त्यांनी भारतीय रोड काँग्रेसला दिल्लीत जागा आणि अनुदान देण्याची तयारीही दर्शवली. “जर भारतीय रोड काँग्रेस इच्छूक असेल तर सरकार त्यांना दिल्लीत कार्यालय आणि प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी जागा द्यायला सरकार तयार आहे. मात्र, त्यांनी स्वतंत्र आणि निष्पक्ष संघटना म्हणून काम केलं पाहिजे”, असे ते म्हणाले. तसेच “जर दर्जेदार काम हवं असेल तर एखाद्या संस्थेला स्वायत्तता देणं आवश्यक आहे. सरकारचा हस्तक्षेप असला की अनेकदा निर्णय घेताना अडचणी निर्माण होतात, सरकारमध्ये अनेकदा योग्यतेचा विचार न करता निर्णय स्वीकारले जातात” असंही त्यांनी नमूद केलं.