Suvendu Adhikari New Slogan : पश्चिम बंगालमधील भाजपाचे आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी भाजपाच्या बैठकीत “सबका साथ, सबका विकास” या घोषणेचा विरोध करत नवी घोषणा दिली. लोकसभा निवडणुकीनंतर अधिकारी यांनी पश्चिम बंगालमधील भाजपा कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीत भाषण करत असताना त्यांनी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या सबका साथ, सबका विकास या घोषणेचा विरोध केला. त्याऐवजी त्यांनी “जो हमारे साथ, हम उनके साथ” (जो आमच्या बरोबर, आम्ही त्याच्याबरोबर) अशी नवी घोषणा दिली.
अल्पसंख्याक मोर्चाचीही गरज नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा नाकारूनच अधिकारी थांबले नाहीत. तर त्यांनी पक्षाअंतर्गत असलेला अल्पसंख्याक मोर्चाही बरखास्त करण्यात यावा, अशी मागणी केली. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत असताना त्यांनी याबाबत सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, आपण राष्ट्रवादी मुस्लीमांविषयी बोललो आहोत. तसेच आपल्या पक्षातील नेते सबका साथ, सबका विकास वैगरे बोलत असतात. पण मी आता ही घोषणा आणखी देणार नाही. आता जो आपल्या बरोबर असेल, त्याच्याबरोबरच आपण राहायचे.
हे वाचा >> बंगाली अस्मिता वरचढ! पश्चिम बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्वाचा प्रयोग अपयशी
पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रकारे लोकसभेचा निकाल लागला त्यावरून सुवेंदू अधिकारी नाराज असल्याचे म्हटले जाते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने याठिकाणी १८ मतदारसंघात विजय मिळविला होता. यंदा त्यांनी ४२ पैकी ३० जागा जिंकण्याचे आव्हान डोळ्यासमोर ठेवले होते. मात्र भाजपाला केवळ १२ जागा जिंकण्यात यश आले. सहा जागांचे नुकसान झाल्यामुळे सुवेंदू अधिकारी मोदींच्या घोषणेचा विरोध करत आहेत.
अधिकारी यांनी एक्सवर पोस्ट टाकून माहिती दिली की, यंदा लोकसभा निवडणुकीत जवळपास ५० लाख हिंदू मतदारांना मतदान करण्यापासून रोखले गेले. त्यानंतर पोटनिवडणुकीत जवळपास दोन लाख हिंदूंना मतदान करण्यापासून रोखले गेले.
पंतप्रधान मोदींनी २०१४ मध्ये दिली होती घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ साली निवडणुकीदरम्यान सबका साथ, सबका विकास हा नारा दिला होता. त्यावेळच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान या नाऱ्याने लोकांचे लक्ष वेधले होते. यामाध्यमातून भाजपाने सर्व समाजघटकांना विकासाचे आश्वासन दिले. मागासवर्गीय, अल्पसंख्याक, वंचित, महिला, शेतकरी, कामगार अशा सर्वांचाच सर्वसमावेशक विकास करण्याची ग्वाही या नाऱ्याच्या माध्यमातून दिली गेली.
हे ही वाचा >> एकमेकांवर टीका करणाऱ्या तृणमूल-भाजपाने अचानक डाव्यांकडे का वळवला आहे मोर्चा?
पश्चिम बंगालमधील मुस्लीम तृणमूलचे मुख्य मतदार
पश्चिम बंगालमधील मुस्लीम हे तृणमूल काँग्रेस पक्षाचे प्रमुख मतदार मानले जातात. डावे आणि काँग्रेसही या मतपेटीवर डोळा ठेवून आहेत. भाजपानेही या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. २०१८ साली बंगालच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत अल्पसंख्याकांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी मुस्लीम संमेलन घेतले होते. तसेच ८५० हून अधिक मुस्लीम उमेदवारांना तिकीटही दिले गेले होते. तर २०१६ साली विधानसभेला सहा मुस्लीम मतदार निवडणुकीत उतरवले होते. बंगालमध्ये एकूण मतदारांपैकी जवळपास ३० टक्के मुस्लीम मतदार आहेत. मुस्लीम मतपेटी याठिकाणी निर्णायक मानली जाते.