गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे आवाहन; अभिनेता आमिर खानवर अप्रत्यक्ष टीकास्त्र
काँग्रेस व तमाम विरोधक करीत असलेल्या असहिष्णुतेच्या आरोपास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा पुढे करून प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी धर्मनिरपेक्ष शब्दावरून चांगलेच सुनावले. धर्मनिरपेक्ष शब्द घटनादुरुस्ती करून संविधानात घुसवण्यात आला. त्यातून विपरीत अर्थ काढण्यात आले. (यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी) धर्मनिरपेक्ष शब्दाचा दुरुपयोग केल्याची टीका राजनाथ सिंह यांनी केली. ते म्हणाले की, मूळ इंग्रजी सेक्युलॅरिझम शब्दाचा अर्थ पंथनिरपेक्ष असा आहे. त्यास धर्मनिरपेक्ष असा अर्थ देण्यात आला. या शब्दाचा वापर बंद करून पंथनिरपेक्ष शब्द प्रचलित झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी राजनाथ सिंह यांनी केली. त्यानंतर सभागृहात एकच गलका झाला.
राजनाथ सिंह यांनी आमिर खान चे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, सामाजिक अवहेलना व तिरस्कार वाटय़ाला आल्यानंतरही डॉ. आंबेडकर यांनी देश सोडण्याची भाषा केली नाही. भारतात उपेक्षा झाली म्हणून दुसऱ्या देशात जाण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. मुस्लीम समुदायातील सर्व ७२ फिरके (पंथ) केवळ भारतातच आहेत. त्यामुळे आम्हाला धर्मनिरपेक्ष शब्दाची गरज नाही.
राजनाथ सिंह यांनी धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा छेडताच काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट आर्य-अनार्य वादालाच हात घातला. तुम्ही (आर्य) बाहेरून आलात. आम्ही (अनार्य) इथेच राहत होतो. पाच हजार वर्षे मार खाल्ल्यानंतर आम्ही येथे आलो आहोत. घटनानिर्मात्यांना ‘सेक्युलर’ शब्द हवा होता, पण त्या वेळी विरोध झाला होता, असे खरगे म्हणाले.
राजनाथ म्हणाले..
’प्रभू श्रीराम लोकशाहीवादी होते.
’वेदांमध्ये प्रजासत्ताकाची मांडणी
’ आर्थिक समरसता भारताला मान्य
’ भारतीय राज्यघटना रक्तविहीन क्रांतीचे प्रतीक
’ झाडू मारणे हीन व जातीयतेचे प्रतीक मानले जाते. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेऊन ‘स्वच्छ भारत’ अभियान सुरु केले
’भारतमातेच्या पोटी जन्म घेणारा प्रत्येक जण भारतीय