Violence on Bangladeshi Hindu: बांगलादेशमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देशातून काढता पाय घ्यावा लागल्यानंतर सत्तांतर झालं. यानंतर तेथील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. हिंदूंवरील अत्याचाराबाबत भारताकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता या घटनेचे पडसाद अमेरिकेतही उमटले आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील आकाशात एक मोठा बॅनर हवेत उडाताना दिसला. ज्यावर इंग्रजीत “Stop Violence on Bangladeshi Hindus” असे लिहिले होते. न्यूयॉर्क मधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या पुतळ्याजवळ आणि प्रसिद्ध हड्सन नदीजवळील आकाशात हा बॅनर उडताना दिसून आला. या घटनेचा व्हिडीओ आता जगभरात व्हायरल झाला असून या विषयाकडे लक्ष वेधून घेतले गेले आहे.

बांगलादेशमध्ये ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना यांना देशातून काढता पाय घ्यावा लागला. तेव्हापासून त्या भारताच्या आश्रयास आहेत. बांगलादेशमध्ये त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या मार्गदर्शनाखाली हंगामी सरकार स्थापन झाले. मात्र अचानक हिंदूंवरील अत्याचार वाढीस लागले. बांगलादेशमधील दोन लाख हिंदूंना याचा फटका बसला असून अनेक ठिकाणी हत्या, हिंसाचार, अपहरण, लहान मुलींवर बळजबरी, नोकरीवरून काढून टाकणे असे अनेक गुन्हे राजरोसपणे घडत आहेत. माध्यमांत आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २५० हून अधिक हल्ले हिंदूवर करण्यात आले असून जवळपास १००० घटनांची नोंद झाली आहे.

हे वाचा >> बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू धोक्यात; भारतासमोर हिंदू निर्वासितांच्या आश्रयाचे संकट?

बांगलादेशी हिंदू कम्युनिटीचे सदस्य सितांग्शु गुहा यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, बांगलादेशमधील हिंदू नामशेष होण्याच्या मार्गार आहेत. न्यूयॉर्कमध्ये फलक झळकविल्यानंतर आम्हाला आशा आहे की, जगामध्ये याबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि बांगलादेशमध्ये अतिरेकी इस्लामिक शक्तीचा अत्याचार थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडून काहीतरी कारवाई करण्यात येईल. जर बांगलादेशमधून हिंदू नष्ट झाले तर ते राष्ट्र दुसरे अफगाणिस्तान बनेल. तसेच या देशातील अतिरेकी शेजारच्या भारत आणि जगाच्या इतर भागात पसरतील. ही आता जगाची समस्या झाली आहे.

हे वाचा >> Bangladesh 1971: चार लाख महिलांवर बलात्कार, ३० लाख मृत्यू; बांगलादेश पुन्हा त्याच वाटेवर आहे का? काय सांगतो इतिहास?

इंटरफेथ ह्युमन राइट्स कोएलेशन या संस्थेने हे फलक झळकविण्यात पुढाकार घेतला. संस्थेचे सदस्य पंकज मेहता म्हणाले की, संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेने राजकारण बाजूला ठेवून १९७१ मध्ये बांगलादेशमध्ये घडलेल्या नरसंहाराला मान्यता देण्याची आता वेळ आली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरचे हा सर्वात मोठा नरसंहार होता. संयुक्त राष्ट्राने या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे आणि पुन्हा एकदा मोठा नरसंहार होण्यापासून रोखले पाहीजे.