इजिप्तमधील अस्वानमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराने हाहाकार माजवला आहे. त्यातच पावसामुळे मोठ्या प्रमाणात विंचू लोकांच्या घरात आश्रय घेण्यासाठी शिरत आहेत. घरात शिरलेल्या या विंचवांनी शेकडो लोकांना दंश केलाय. तीन जणांचा विंचवांनी दंश केल्यामुळे मृत्यू देखील झाला आहे. तर ४०० हून अधिक लोकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती अल-झझीराने दिली आहे.
कार्यवाहक आरोग्य मंत्री खालिद अब्देल-गफार यांनी एका निवेदनात सांगितले की, विंचवांनी दंशामुळे कोणताही मृत्यू झाल्याची नोंद नाही. तसेच अस्वानमध्ये अँटी-वेनमचा पुरेसा मोठा साठा असून सध्या३३५० डोस उपलब्ध आहेत, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, असे आरोग्य मंत्रालयाने जनतेला सांगितले. दरम्यान, ज्या लोकांना विंचूने दंश केला होता, त्यांना तीव्र वेदना, ताप, घाम येणे, उलट्या होणे, जुलाब, स्नायूंचा थरकाप आणि डोके दुखणे, चक्कर येणे यासारख्या लक्षणांचा समावेश होता.
अस्वानचे पर्वत हे जाड शेपटीच्या अरबी विंचवांचे घर आहेत. या विंचवांना अँड्रोक्टोनस क्रॅसिकाउडा म्हटलं जातं. याचा अर्थ माणसाला मारणारा असा होतो. ते जगातील सर्वात धोकादायक विंचू मानले जातात. या विंचूंमध्ये अत्यंत विषारी विष आहे. या विंचूने एखाद्या प्रौढ व्यक्तीला दंश केल्यानंतर ती व्यक्ती एका तासाच्या आत मरू शकते. या विंचवांच्या दंशामुळे अस्वानमध्ये वर्षभरात अनेक लोकांचे मृत्यू होतात. हे विचूं ८-१० सेंटीमीटर एवढे लांब असतात. तसेच त्यांची दृष्टी, ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमता कमी असल्यामुळे ते शिकार शोधण्यासाठी तो हालचाल आणि आवाजावर अवलंबून असतात.
दरम्यान, मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी रविवारी शाळा बंद केल्या आहेत, असे राज्यपाल अश्रफ अटिया यांनी सांगितले.