‘हॅलो… देवारपल्ली प्रकाश राव बोलताय का?’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हो…’

‘नमस्कार आम्ही दिल्लीहून बोलत आहोत. तुम्हाला यंदाच्या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.’

असाच काहीसा संवाद २५ जानेवारीच्या रात्री साडेअकरा वाजता आलेल्या एका फोन कॉलवर झाला आणि पेशाने चहावाले असणारे देवारापल्ली प्रकाश राव हे ‘पद्मश्री देवारापल्ली प्रकाश राव’ झाले. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका चहावाल्याला पद्मश्री कशासाठी? तर मागील अनेक दशकांपासून गरिबांना स्वस्तात शिक्षण मिळावे म्हणून काम करत आहेत. समाज सेवेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना देशातील चौथा सर्वोच्च पुरस्कार असणारा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

‘मला फोनवरून पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचे रात्री साडेअकराच्या सुमारास कळवण्यात आले. मी खरच हा पुरस्कार स्वीकारण्या इतका मोठा नाही मात्र जर देशातील लोकांना मी हा पुरस्कार स्वीकारावा असं वाटत असेल तर या पुरस्काराच्या माध्यमातून इतर लोकांना असे काम करण्याची प्रेरणा मिळेल.’ अशी पहिली प्रतिक्रिया पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राव यांनी नोंदवली.

चाहवाला ते पद्मश्रीपर्यंतचा प्रवास

कटक शहरामधील बक्षी बाजार परिसरामधील एका गल्लीमध्ये राव चहाची टपरी चालवतात. मुळात आज ६१ वर्षांचे असणारे राव हे वयाच्या सहाव्या वर्षापासून आपल्या वडिलांनी सुरु केलेल्या या चहाच्या टपरीवर काम करतात. त्यांचे वडील दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिश सरकारकडून लढले होते. युद्धानंतर पुन्हा ते कटक या आपल्या मूळ शहरात परत आले आणि नोकरी शोधण्यास सुरुवात केली. पण कोणीही त्यांना नोकरी देण्यास तयार होत नव्हते. अखेर त्यांनी कसेबसे पाच रुपयांच्या भांडवलावर चहाची टपरी सुरु केली. मागील पाच दशकापासून राव हे आपल्या वडिलांची ही टपरी चालवत आहे.

गरिबीमध्ये दिवस काढलेल्या राव यांनी बेटर इंडियाला दिलेलेल्या मुलाखतीमध्ये ते समाजसेवेकडे कसे वळले याबद्दल माहिती दिली. झोपडपट्टीमध्ये राहताना अनेकदा पालकांकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणला होणारा विरोध दिसून आला. झोपट्टीमध्ये राहणारे अनेकजण त्यांच्या मुलांकडे कमाईचे एक माध्यम म्हणजेच पैसे कमवून देणारे हात म्हणून बघतात. असे पालक मुलांना शिक्षण देण्याऐवजी त्यांना लहानमोठ्या कामांमध्ये गुंतवतात. ही मुले दुकानात काम करणे, घरातील कामे करणे अशी कामं करुन थोडे फार पैसे कमावतात पण ते पैसेही घरातील पुरुष त्यांच्याकडून दारूसाठी काढून घेतात आणि घरातील स्त्रीला त्यांच्यासमोरच मारहाण करतात. हे सर्व अनेकदा पाहिल्यानंतर मला याचा खूप त्रास झाल्याचे राव सांगतात.

त्यानंतर या मुलांसाठी मी काय करु शकतो असा विचार माझ्या मनात आला. मी स्वत: एक चांगला विद्यार्थी आणि फुटबॉलपटूही होतो. मला डॉक्टर व्हायचे होते पण मला चहावाला व्हावे लागले. इच्छा असूनही शिकता न येणे किती त्रासदायक असते हे मला ठाऊक आहे. म्हणूनच या मुलांवर माझ्यासारखी वेळ येऊ नये म्हणून मीच पुढाकार घेण्याचा निर्णय घेतल्याचे राव सांगतात.

त्यानंतर त्यांनी आपल्या चहाच्या टपरीवर विकल्या जाणाऱ्या प्रत्येक चहाच्या कपमागील अर्धी कमाई या मुलांच्या शिक्षणसाठी आणि आरोग्य सेवेसाठी बाजूला काढण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या कामाची सुरुवात चार विद्यार्थ्यांपासून आपल्या छोट्या राहत्या घरातूनच केली. या चारही मुलांना त्यांनी मोफत खाणे आणि शिक्षण देण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. मात्र अनेक पालकांनी त्यांना विरोध केला. ‘शिकून काय करणार आहे माझी मुलगी. सध्या ती घरकाम करुन ७०० रुपये महिना तरी कमवते. त्यांना शिकवून तुम्ही आमच्या पोटावर का लाथ मारत आहात?’ असा आक्षेप एका मुलीच्या आईने नोंदवल्याची आठवण राव करुन देतात. मात्र विरोध झाल्यानंतरही त्यांनी आपले काम सुरुच ठेवले.

आज राव स्थापन केलेल्या ‘आशा ओ आश्वासना’ या शाळेच्या माध्यमातून शेकडो गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य सुधारले आहे. सुरुवातील विरोध करणारे पालक आता आपल्या मुलांना शाळेत जाताना अभिमानाने पाहतात. ‘रोज मी या मुलांसाठी वरण, भात आणि भाजी घरीच करतो. हे घरचे जेवण खाताना त्यांच्या चेहऱ्यावरील समानाधानाचे भाव पाहून मला खूप आनंद मिळतो.’

मोदींशी झालेली भेट आणि मन की बात

पंतप्रधान मोदी २०१८ साली कटक दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी राव यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी ‘हे सर्वोत्तम जेवण आहे’ असे मत नोंदवले होते. पंतप्रधानांनी राव यांचा उल्लेख त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातही केला होता. राव यांचे कार्य आपल्याला ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या वाक्याचा खरा अर्थ समजवून सांगते. असं म्हणताना मोदींनी राव यांची तुलाना दिव्याशी केली. राव यांच्या रुपातील हा दिवा गरीब मुलांना अंधारातून उजेडाकडे घेऊन जात असल्याचा अर्थ मोदींना अभिप्रेत होता. मोदींनी आपले नाव या कार्यक्रमामध्ये घेणे हा माझा सर्वात मोठा गौरव असल्याचे राव सांगतात. समाजासाठी मी केलेले योगदानाची पंतप्रधान मोदींनी दखल घेतली ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचे राव म्हणाले. मोदींनी माझे नाव कार्यक्रमामध्ये घेतल्यानंतर लोकांनी मला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. लोकांचा हा पाठिंबा खूप आनंददायी आहे. लोक जेव्हा म्हणतात माझ्यामुळे मुलांच्या आयुष्याला आकार मिळाला तेव्हा मी त्यांना सांगतो त्या मुलांमुळे माझ्या आयुष्याला आकार मिळाला. आज मी उभी केलेली शाळा हे विद्येचे मंदिर झाले आहे. आज वयाच्या ६१ व्या वर्षीही मी तंदरुस्त आहे. मी स्वत:ला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती समजतो कारण मी जे काम करतोय त्यामधून मला मिळणारा आनंद हा पैश्यामध्ये किंवा कोणत्याही दागिण्यांच्या किंमतीमध्ये मोजता येणार नाही आणि विकतही घेता येणार नाही’ असं राव सांगतात.

१९७६ पासून नियमितपणे रक्तदान करणारे राव हे खऱ्या अर्थाने आदर्श व्यक्तीमत्व असल्याचे मत सोशल मिडियावरून व्यक्त होत आहे. या पुरस्कारामुळे तरुणांना समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा राव यांनी व्यक्त केली आहे.

तरुणांना संदेश

‘आजच्या धावपळीच्या जगामध्ये तरुणांना एका दिवसात श्रीमंत होण्याची इच्छा असते. अशा तरुणांना मी इतकचं सांगेल की पैसा सर्वकाही नाही. यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट उपलब्ध नाही. तुमच्या मार्गात अनेक अडथळे येतील, मात्र तुम्ही स्वार्थी हेतून काम न करता स्वत:ला त्या कामात झोकून द्याल तेव्हा तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तुम्ही तुमचे आयुष्य आनंदाने जगा पण तुमच्यापेक्षा हालाखीचे जीवन जगत असणाऱ्यांना मदतीचा हात नक्की द्या. जेव्हा आपण एकमेकांना मदतीचा हात देऊ तेव्हाच भारत पुन्हा सोन्याची चिमणी असणारा देश म्हणून ओळखला जाईल’, असं मत राव यांनी तरुणांना संदेश देताना ‘द बेटर इंडियाशी’ बोलताना व्यक्त केले.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of incredible inspiring odisha chaiwala devarapalli prakash rao who won padma shri for