एपी, केप कॅनाव्हरल
‘नासा’च्या नवीन अंतराळवीरांना घेऊन ‘स्पेस-एक्स’चे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले असून, बुच विल्मर आणि सुनीता विल्यम्स यांनी नव्याने दाखल झालेल्या या अंतराळवीरांचे स्वागत केले. दोघेही अंतराळवीर गेल्या नऊ महिन्यांपासून अवकाशात अडकून पडले असून बुधवारी त्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल.

उड्डाणानंतर दिवसभराच्या कालावधीत ‘स्पेस-एक्स’चे यान स्थानकात पोहोचले. विल्मर आणि विल्यम्स यांच्या जागी आता अमेरिका, जपान आणि रशियाचे अंतराळवीर तेथे थांबतील. पुढील काही दिवसांत ते अंतराळ स्थानकातील गोष्टी जाणून घेतील. नवीन अंतराळवीर आल्यानंतर विल्मर यांनी हस्तांदोलन आणि आलिंगन देऊन त्यांचे स्वागत केले. ‘आमचे मित्र आल्याचे पाहून खूप आनंद वाटला. आजचा दिवस खूप छान आहे,’ अशी प्रतिक्रिया विल्यम्स यांनी दिली.