सबवे ट्रेनमध्ये एका प्रवाशाचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाचा गळा पकडून त्याला रेल्वेत खाली पाडलं. आरोपीने बराच वेळ दाबून ठेवल्याने प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमधील या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये मृत व्यक्ती स्वत:ला सोडवण्यासाठी हात-पाय मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ मुक्त पत्रकार जुआन अल्बर्टो वाझक्वेझ यांनी त्यांचं फेसबुक पेज “लुसेस डी नुएवा यॉर्क”वर शेअर केला आहे.
हेही वाचा-हिंदू मुलीशी बोलल्याने मुस्लीम तरुणाला बेदम मारहाण, चौघांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना न्यूयॉर्क शहरातील एका सबवे ट्रेनमधील आहे. घटनेच्या वेळी उपस्थित लोकांनी सांगितले की, मृत व्यक्ती ट्रेनमधील इतर प्रवाशांबरोबर वाद घालण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी एका २४ वर्षीय प्रवाशाने त्याला पाठीमागून पकडून खाली आदळलं आणि गळा दाबून धरला. यातच त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी आरोपीची चौकशी करून त्याला सोडून दिले आहे. तसेच, आरोपी तरुणाचं नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
वाझक्वेज नावाच्या प्रत्यक्षदर्शीने ‘एनबीसी न्यूज’ला सांगितलं की, ही घटना घडली तेव्हा तो ट्रेनमध्येच होता. मृत व्यक्ती जेव्हा मेट्रो ट्रेनमध्ये चढली तेव्हा तो विचित्र वागत होता आणि आरडाओरडा करत होता. मला भूक लागली आहे, तहान लागली आहे. तुरुंगात जाण्यासही मी घाबरत नाही, असं तो म्हणत होता. मृत व्यक्तीच्या या वागण्यामुळे ट्रेनमध्ये बसलेले इतर लोक घाबरले. याचवेळी एका तरुणाने मृत व्यक्तीचा पाठीमागून गळा पकडला आणि त्याला ट्रेनमध्ये आदळलं. त्याने सुमारे १५ मिनिटं त्याला तसेच धरून ठेवलं. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत तो बेशुद्ध पडला होता, नंतर त्याचा मृत्यू झाला.