भटक्या कुत्र्यांकडून निवासी संकुलात नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. यामध्ये अनेकदा लहान मुलांवरही भटक्या कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकरणांत अनेकदा गंभीर जखम झाल्याचंही दिसून आलं आहे. उत्तर प्रदेशच्या अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीमध्ये अशाच एका प्रकरणात एका ६५ वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. या धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही फूटेजही समोर आलं आहे.
नेमकं घडलं काय?
रविवारी सकाळी ६५ वर्षीय सफदर अली हे नेहमीप्रमाणे मॉर्निंक वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्यांच्या नेहमीच्या रस्त्याने ते अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून फेरफटका मारत असताना अचानक त्यांच्यावर काही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या घटनेच्या सीसीटीव्ही फूटेजनुसार ७ ते ८ कुत्र्यांनी अली यांच्यावर हल्ला केला. त्यांना ओढत हे कुत्रे बाजूच्या लॉनवर घेऊन गेले आणि एकाच वेळी हे सगळे कुत्रे त्यांच्यावर तुटून पडले.
अती रक्तस्रावामुळे वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी सकाली ६ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी डॉग स्क्वॉडसह घटनास्थळी धाव घेतली. सुमारे साडे सातच्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कुत्र्यांना पळवून लावत जखमी अवस्थेतील सफदर अली यांना रुग्णवाहिकेनं रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. मात्र, रुग्णालयात जातानाच अती रक्तस्त्रावामुळे अली यांचा मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारे कुत्र्यांनी हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने घरात पाळीव कुत्रे ठेवणाऱ्या नागरिकांना हे कुत्रे कोणत्याही प्रकारे इतरांना त्रास होऊ देणार नाही, असं शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.