अमेरिकेने अलीकडेच स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडलेल्या ३०६ भारतीय विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. ते बेकायदेशीररीत्या अमेरिकेत राहात होते असे परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितले, की हे विद्यार्थी कायदेशीर व्हिसा घेऊन आले होते, पण त्यांनी नंतर वास्तव्य वाढवताना गैरमार्गाचा अवलंब केला. या विद्यार्थ्यांची संख्या ३०६ असून ते अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडले होते. एकूण २१ मध्यस्थ व भारतीय वंशाचे ११ जण यांना गेल्या आठवडय़ात अटक करण्यात आली होती. टोनर यांच्या मते ज्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील त्यांचा वास्तव्य काळ बेकायदेशीररीत्या वाढवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

जे विद्यार्थी कायदेशीर व्हिसा घेऊन आले आहेत व ज्यांनी नंतर काही बेकायदेशीर मार्गाचा वापर केलेला नाही त्यांची छळवणूक केली जाणार नाही. महाविद्यालये व कामाच्या ठिकाणी राहण्यासाठी बेकायदेशीर पद्धतीने व्हिसा मुदत वाढवण्यास आमचा आक्षेप आहे. भारतीय विद्यार्थ्यांना तेथील अमेरिकी राजनैतिक दूतावासाने व्हिसा दिलेला आहे तो नामांकित अमेरिकी संस्थात अभ्यासासाठी दिला आहे. बनावट विद्यापीठात प्रवेशासाठी दिलेला नाही. अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने एक बनावट विद्यापीठ सुरू करून स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यात ११ भारतीय वंशाचे विद्यार्थी व इतर २१ जण यांना ताब्यात घेतले होते. अमेरिकेत आल्यानंतर व्हिसाची मुदत संपल्यानंतर ती बेकायदेशीर संस्थात प्रवेश दाखवून वाढवून घेणे चुकीचे आहे, असे अमेरिकी प्रशासनाचे म्हणणे आहे.

Story img Loader