पीटीआय, वॉशिंग्टन/लंडन

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील मंगळवारच्या दहशतवादी हल्ल्याचा जागतिक स्तरावरून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त होत आहे. युरोपीय महासंघाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन, संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी बुधवारी या हल्ल्याचा निषेध केला. तसेच अमेरिका, चीन, जर्मनी, युएई, पाकिस्तान आणि श्रीलंकेनेही हल्ल्यातील मृतांबद्दल शोक व्यक्त केला.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आदींनी मंगळवारी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत भारताला पाठिंबा दर्शविला.

युरोपियन महासंघाच्या अध्यक्ष वॉन डेर लेयन यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ला ‘घृणास्पद’ असल्याचे म्हटले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप जीव गेले. हल्ल्याचा शोक व्यक्त करणाऱ्या प्रत्येक भारतीयाबद्दल माझी तीव्र संवेदना, असे त्यांनी ‘एक्स’वरील संदेशात म्हटले आहे.

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनीही बुधवारी दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. या कठीण प्रसंगी नेपाळ भक्कमपणे भारताच्या पाठीशी आहे. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो, असे त्यांनी ‘एक्स’वरील शोकसंदेशात म्हटले आहे. श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. ‘आम्ही पीडितांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकर बरे होण्याची इच्छा करतो. दहशतवादा विरुद्धच्या सर्वप्रकारच्या लढाईत श्रीलंका भारताबरोबर दृढ एकता दर्शवितो,’ असे श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

काश्मीरमधील भ्याड हल्ल्यानंतर मी भारतीय जनतेबद्दल माझ्या संवेदना व्यक्त करतो. या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना लवकरच शिक्षा होईल, अशी आशा आहे. दहशतवाद कधीही सहन केला जाणार नाही, असे अमेरिकी सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीचे अध्यक्ष सिनेटर जिम रिश यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

चीनकडूनही दखल

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा चीनने बुधवारी तीव्र निषेध केला. ‘चीनने या हल्ल्याची दखल घेतली आहे,’ असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काश्मीरमध्ये झालेला भ्याड दहशतवादी हल्ला अत्यंत विनाशकारी आहे. या हल्ल्यात प्रभावित झालेल्यांच्या पाठिशी माझ्या संवेदना. आम्ही भारताच्या पाठिशी आहोत.कीर स्टार्मर, पंतप्रधान, ब्रिटन

पहलगाम येथील सशस्त्र हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. नागरिकांवरील दहशतवादी हल्ले कोणत्याही परिस्थितीत अस्वीकार्य आहेत. पीडितांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना.अँटोनियो गुटेरेस, सरचिटणीस, संयुक्त राष्ट्र