पीटीआय, नवी दिल्ली
गेल्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी दमदार होत असून यापुढेही हा वेग कायम राहील असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात त्यांनी राम मंदिर हा केवळ श्रद्धेचा विषय नसून न्याययंत्रणेवरील लोकांच्या विश्वासाचाही पुरावा आहे, असे म्हटले आहे.
आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी सरकारच्या विविध सामाजिक योजना, महिला सक्षमीकरण, शिक्षण अशा अनेक विषयांवर भाष्य केले. दिल्लीमध्ये झालेल्या जी-२० शिखर परिषदेमुळे भारत विकसनशील देशांचा आवाज बनल्याचे स्पष्ट झाल्याचे त्या म्हणाल्या. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात क्रांती होत आहे. त्याची काही आव्हाने असली तरी मोठय़ा प्रमाणात संधीदेखील उपलब्ध होणार असल्याचे त्या म्हणाल्या.
हेही वाचा >>>‘राम मंदिराचे लोकार्पण ही ऐतिहासिक घटना’, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे देशाला संबोधन
‘शैक्षणिक धोरणामुळे समानता’
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे तंत्रज्ञानातील दरी दूर होणार असून मागास भागांमधील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे शक्य होणार असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. या धोरणामुळे देशभरात एकसमान शैक्षणिक रचना निर्माण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.