अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी, सर्व ५० राज्यांतील प्रमुख शहरे आणि अमेरिकेबाहेरील लंडन, पॅरिससारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे अब्जाधीश सहकारी, उद्याोगपती इलॉन मस्क यांच्या धोरणांविरोधात शनिवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. सरकारी खर्चात कपात, अर्थव्यवस्था, मानवाधिकार आणि इतर मुद्द्यांवर ट्रम्प यांच्या लोकशाहीवादी विरोधकांनी आयोजित केलेल्या या निदर्शनांना प्रतिसाद देत लाखो अमेरिकी नागरिक रस्त्यांवर उतरले.

अमेरिकेतील १५०पेक्षा जास्त वेगवेगळ्या गटांनी देशभरात १२००पेक्षा जास्त ठिकाणी निदर्शने आयोजित करण्यात आली. या गटांमध्ये नागरीहक्कांसाठी लढणाऱ्या संघटना, एलजीबीटीक्यू समुदायाचे कार्यकर्ते, कामगार संघटना, राजकीय नेते अशा विविध स्तरांतील गटांचा समावेश आहे. निदर्शकांच्या हातामध्ये ‘हँड्स ऑफ’चा संदेश देणाऱ्या फलकांसह, ट्रम्प आणि मस्क यांचा निषेध करणारे फलक होते. काही जणांनी स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यासारखा पोशाख करून अमेरिकेचे स्वातंत्र्य धोक्यात असल्याचा संदेश दिला. अमेरिकेमध्ये मूठभर अब्जाधीश हेच खरे अल्पसंख्यांक आहेत, अन्य कोणी नाही असाही संदेश एका फलकावर दिसला.

ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यापासून अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी खर्चात कपात करणे, सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे, सामान्य नागरिकांना किफायतशीर दरात जीवनावश्यक सेवा प्रदान करणाऱ्या सोशल सिक्युरिटीसारख्या योजना बंद करणे, स्थलांतरितांना देशाबाहेर काढणे, पारलिंगींची सुरक्षितता काढून घेणे, आरोग्य योजनांवरील खर्च कमी करणे अशा अनेक निर्णयांमुळे त्यांच्याविरोधात नाराजी वाढत आहे. त्यांच्या जोडीला इलॉन मस्क यांचा प्रशासनातील हस्तक्षेपही अमेरिकी नागरिकांना पसंत नाही. सरकारी खर्च कमी करून आपण करदात्यांचे पैसे वाचवत असल्याचा मस्क यांचा दावा अमेरिकी नागरिकांना मान्य नाही.

अमेरिकेच्या इतिहासातील हा महत्त्वाचा क्षण आहे, मी यापेक्षा जास्त काय करू शकतो असे आपल्यापैकी प्रत्येकजण विचारू लागेल. मी येथे डेमोक्रॅटिक पक्षाबद्दल काही बोलणार नाही, माझे लक्ष देशाच्या जनतेकडे आहे. – कोरी बुकर, सेनेट सदस्य, डेमोक्रॅटिक पक्ष

व्हाइट हाऊसचा प्रतिसाद

व्हाइट हाऊसने एका निवेदनाच्या माध्यमातून या निदर्शनांना उत्तर दिले. पात्र लाभार्थींना ‘सोशल सिक्युरिटी’, ‘मेडिकेअर’ आणि ‘मेडिकाएड’ या योजनांचा लाभ मिळत राहील अशी अध्यक्ष ट्रम्प यांची भूमिका आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या भूमिकेमुळे या योजनांचा लाभ बेकायदा परदेशी लोकांना होत होता. त्यामुळे या योजना दिवाळखोरीत निघतील आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ मिळणार नाही, असा दावा व्हाइट हाऊसने केला.