पाकिस्तानची सून म्हणून उल्लेख केल्यामुळे नाराज झालेल्या टेनिसपटू सानिया मिर्झाने कोणीही जितक्या वेळा माझा परदेशी म्हणून उल्लेख करेल तितक्या वेळा मी त्याचा निषेध करेन, या शब्दांत आपली भावना गुरुवारी व्यक्त केली.
सानिया मिर्झा हिची तेलंगणा राज्याची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्याचा तेथील राज्य सरकारचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. भारतीय जनता पक्षाचे तेलंगणातील नेते के. लक्ष्मण यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला असून, पाकिस्तानच्या सुनेला भारतात हा सन्मान देण्याची काय गरज आहे, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्या पार्श्वभूमीवर आपली बाजू मांडताना सानिया म्हणाली, तेलंगणाच्या ब्रॅण्ड अम्बेसिडर पदावर नियुक्ती करण्याच्या विषयावरून टीकाटिप्पणीमध्ये इतका वेळ वाया घालवला जातो, हे पाहून दुःख होते. मला जोपर्यंत कोणी परदेशी म्हणत राहिल, तोपर्यंत मी त्याचा निषेध करत राहिन, असेही तिने म्हटले आहे.
दरम्यान, भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सानिया मिर्झा ही देशाचा अभिमान असल्याचे वक्तव्य दिल्लीत केले. सानियाबाबत तेलंगणामध्ये भाजपच्या नेत्याने जे मत व्यक्त केले, त्याच्याशी सहमत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader