तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नीट परिक्षेत नापास झाल्याने १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. त्यानंतर सोमवारी ( १४ ऑगस्ट ) तरुणाच्या वडिलांनीही आत्महत्या केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अशात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी नीट परिक्षा रद्द करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
“कोणत्याही विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा विचार करू नये. नीटची परीक्षा रद्द करण्यात येईल. त्यासाठी सरकार काम करत आहे,” असं स्टॅलिन यांनी सांगितलं.
नीट परीक्षेत दोनदा नापास झाल्याने १९ वर्षीय वैद्यकीय विद्यार्थ्याने चेन्नईत आत्महत्या करत आपले जीवन संपवलं होतं. त्यानंतर सोमवारी तरुणाच्या वडिलांनी आत्महत्या केली.
पिता-पुत्रांच्या आत्महत्येनंतर स्टॅलिन यांनी शोक व्यक्त केला आहे. “विद्यार्थी जगतीश्वरन आणि त्याचे वडील सेल्वाशेखर यांच्या निधानाबद्दल मी शोक व्यक्त करतो. नीट परीक्षेसाठी झालेला हा शेवटचा मृत्यू असू दे,” असेही स्टॅलिन यांनी म्हटलं.
तामिळनाडूला नीट परीक्षेतून सूट देण्याची मागणी करणारे विधेयक राज्यपालांनी मंजूर न केल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला. “राज्यपालांना हे विधेयक मंजूर करायचे नाही, असं दिसतं. नीट परीक्षा फक्त श्रीमंत लोकांनाच परवडते. ज्यांना पैसे खर्च करून अभ्यास करणे परवडत नाही ते नापास झाले आहेत.”
“राज्य सरकाराने गरीब विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालयात ७.५ टक्के आरक्षण लागू केलं आहे. पण, राज्यपाल हे कोचिंग क्लासेसच्या बाहुल्यासारखे वागतात की काय?” अशी शंका स्टॅलिन यांनी व्यक्त केली.