Kolkata Rape Case : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टीप्पणी केल्याबद्दल तसेच कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडित डॉक्टर तरुणीची ओळख उघड केल्याबद्दल २३ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे. किर्ती शर्मा असं या विद्यार्थिनीचं नाव असून रविवारी कोलकाता पोलिसांनी ही कारवाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकाता येथे राहणाऱ्या किर्ती शर्मा या विद्यार्थिनीने बलात्कार हत्या प्रकरणाशी संबंधित तीन इंस्टाग्राम पोस्ट शेअर केल्या होत्या, त्यापैकी एका पोस्टमध्ये तिने पीडित डॉक्टर तरुणीचा फोटो वापरत तिची ओळख उघड केली होती. अशा प्रकारे बलात्कार पीडितेची ओळख उघड करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे तिच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी तिला तिच्या लेक टाऊन येथील घरातून अटक केली.

हेही वाचा – Kolkata Doctor Murder : डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून खून; इयरबड्सच्या तुकड्यामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या विरोधात आक्षेपार्ह टीप्पणी

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या विद्यार्थीनीने इतर दोन इंस्टाग्राम पोस्टमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधातही आक्षेपार्ह टीप्पणी केली होती. तसेच तिने केलेल्या दोन्ही पोस्ट या भडकाऊ स्वरुपाच्या होत्या. या पोस्टमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या कारवाईनंतर आरोपी विद्यार्थिनीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विद्यार्थिनीच्या वकिलांकडून पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईवर विद्यार्थिनीच्या वकिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांनी ही कारवाई करण्यात अतिशय तत्परता दाखवली असून ही कारवाई केवळ वरिष्ठांना खूश करण्याठी आहे, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – Mamata Banerjee : “विरोधकांकडून राज्यात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न”; कोलकाता बलात्कार प्रकरणावरून ममता बॅनर्जींनी सुनावलं!

यापूर्वीही पोलिसांकडून अनेकांवर कारवाई

महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी पोलिसांनी भाजपाचे खासदार लॉकेट चॅटर्जी आणि अन्य दोन डॉक्टरांवर पीडित तरुणीची ओळख उघड केल्याप्रकरणी कारवाई केली होती. याशिवाय या प्रकरणाशी संबंधित अफवा पसरवल्या प्रकरणी ५७ जणांनाही समन्स पाठवण्यात आले होते.

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर बलात्कार करत तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोस्टमॉर्टेमच्या अहवालानुसार तिचा शारिरीक आणि लैंगिक छळही करण्यात आला होता. तिच्या चष्म्याच्या काचा फुटून तिच्या डोळ्यांमध्ये घुसल्या होत्या अशीही माहिती समोर आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student arrest revealing identity of kolkata rape case victim offensive comments on mamata banerjee spb