बांगलादेशच्या राजशाही विद्यापीठातील निधर्मी प्राध्यापक रेझाऊल करीम सिद्दिकी यांच्या निर्घृण खूनप्रकरणात एका इस्लामी गटाच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांला पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले.

रेझाऊल सिद्दिकी यांची शनिवारी त्यांच्या घरापासून काही अंतरावर गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी हफिझुर रहमान या २१ वर्षांच्या युवकाला पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. तो विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागात दुसऱ्या वर्षांचा विद्यार्थी आहे. प्रा. सिद्दिकी यांच्या खुनाशी संबंध असल्याच्या संशयावरून आम्ही त्याची चौकशी करत आहोत, अशी माहिती बोआलिया पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शहादत होसेन यांनी दिली.

रहमान हा जमात-ए-इस्लामी या मूलतत्त्ववादी संघटनेची विद्यार्थी शाखा असलेल्या ‘इस्लामिक छात्र शिबिर’ या संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे राजशाही पोलीस आयुक्त मोहम्मद शमसुद्दीन यांनी सांगितले.

बांगलादेशातील बुद्धिजीवी आणि निधर्मी ब्लॉगर्सवर होत असलेल्या हत्यांपैकी या सगळ्यात अलीकडच्या हत्येची जबाबदारी आयसिसने स्वीकारली आहे. या प्राध्यापकाने निरीश्वरवादाचे आवाहन केल्यामुळे त्याची हत्या करण्यात आल्याचे वृत्त अमेरिकेतील ‘साईट’ या गुप्तचर विभागाने शनिवारी दिले होते. मात्र पोलिसांनी या बातम्या ‘अनधिकृत’ असल्याचे सांगून फेटाळून लावल्या आहेत.

 

 

Story img Loader