चौथी इयत्तेत शिकणाऱ्या मुलाला क्षुल्लक कारणावरून मारल्यामुळे त्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बैतुलमधील सरकारी प्राथमिक शाळेत घडली. अस्लम अन्सारी (१०) असे या मुलाचे नाव असून, शिक्षकांनी बेदम मारल्यामुळे गेले पंधरा दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. मंगळवारी रात्री त्याचे निधन झाल्याचे पोलिसांनी सांगितले. १६ नोव्हेंबर रोजी बिरजू कुमार सोनारिया आणि विजय राम भगत या दोन शिक्षकांनी अस्लमला मारहाण केली होती. शाळेमध्ये वस्तू ठेवण्याची परडी कुणी तोडली याचे नाव सांगण्यासाठी अस्लम त्यांच्याकडे गेला होता. तेव्हा स्वत:चा बचाव करण्यासाठी अस्लम दुसऱ्या कुणाचे नाव घेत आहे असा ग्रह करून शिक्षकांनी त्याला जबर मारहाण केली. यात त्याच्या  मान आणि पाठीच्या कण्याला तीव्र इजा झाली. त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या प्रकाराची तक्रार करण्यासाठी अस्लमचे पालक शाळेत आले असता, शिक्षकांनी त्यांच्या हातावर दोनशे रुपये उपचारासाठी टेकवून हे प्रकरण मिटविण्यास सांगितले. मंगळवारी रात्री त्याचे रुग्णालयामध्ये निधन झाले. याप्रकरणी बिरजू कुमार या शिक्षकाला अटक करण्यात आली असून दुसरा शिक्षक फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.   

Story img Loader