शेकडो विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी

संतप्त पॅलेस्टिनी विद्यार्थ्यांनी अल कुड्स विद्यापीठाच्या आवारात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कार्यक्रमप्रसंगी भारताच्या इस्रायलबरोबरच्या मैत्रीच्या वाढत्या संबंधांविरोधात मंगळवारी निदर्शने केली. मुखर्जी यांना विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात मानद पदवी प्रदान करण्यात आली. शेकडो विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करून फलक झळकावले. त्यात भारताचे इस्रायलशी जे घनिष्ठ संबंध आहेत त्यावर टीका करण्यात आली.

इस्रायलशी भारत सहकार्य का करीत आहे, राष्ट्रपती महोदय इस्रायलच्या आक्रमणाविरोधात आवाज उठवा, पॅलेस्टिनींना ठार करणाऱ्यांच्या विरोधात तुम्ही मौन बाळगू नका, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या व फलकही झळकावण्यात आले. पूर्व जेरूसलेममधील विद्यापीठात हा  कार्यक्रम झाला.

सध्या इस्रायल व पॅलेस्टाइन यांच्यात चकमकी सुरू आहेत. त्यात आजही काही चकमकी झाल्या. पॅलेस्टाइनचे पंतप्रधान डॉ. रामी हमादल्ला यांनी मुखर्जी यांना शांततेचे पुरस्कर्ते असे संबोधून पॅलेस्टाइनला भारताने केलेल्या मदतीची प्रशंसा केली. प्रणव मुखर्जी यांनी सांगितले, की मध्य पूर्वेत शांतता नांदणे भारताच्या हिताचे आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी पॅलेस्टाइनला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. भारतीय तंत्रज्ञान व आर्थिक सहकार्य शिष्यवृत्तींसाठी पॅलेस्टिनी विद्यार्थ्यांना यापुढे वर्षांला १०० जागा दिल्या जातील व अल कुड्स विद्यापीठात भारत अध्यासन सुरू केले जाईल, असे मुखर्जी यांनी जाहीर केले. रविवारी जॉर्डन विद्यापीठाने अम्नान येथे एका कार्यक्रमात मुखर्जी यांना राज्यशास्त्रातील मानद पदवी प्रदान केली होती, तर गुरुवारी इस्रायल त्यांना हिब्रू विद्यापीठाच्या वतीने डॉक्टरेट देणार आहे. रामल्ला येथे टेक्नॉलॉजी पार्क सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. अल कुड्स विद्यापीठाला त्यांनी ३० संगणक असलेली संदेशवहन प्रणाली भेट दिली. इस्रायलच्या सीमा शुल्क विभागाने काही नियमांची त्याला आडकाठी केली होती, त्यामुळे अत्यंत आधुनिक असे संदेशवहन उपकरण तूर्त देण्यात आलेले नाही. नंतर इस्रायलमध्ये मान्य असलेल्या कंप्रतेचे उपकरण पॅलेस्टाइनला देण्यात येणार आहे.

Story img Loader