Student films women in Bathroom : गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. कामाच्या ठिकाणी, शाळेत, महाविद्यालयात महिलांवरील अत्याचारात वाढ झालीय. महिलांसाठी कोणतंच ठिकाण सुरक्षित नसल्याने महिलांकडून संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, बंगळुरूतूनही आता असाच एक प्रकार समोर आला आहे. कॉलेजच्या बाथरूममधून महिलांचे रेकॉर्डिंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २१ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने त्याच्या मोबाईलमध्ये जवळपास आठ व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. त्याच्याकडून सातत्याने असे व्हिडिओ रेकॉर्ड केले गेले असतील, असा दावाही काही विद्यार्थ्यांनी केला आहे. काही तक्रारदारांनी दावा केला आहे की संबंधित विद्यार्थ्याने मोबाईलमधील व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल केले आहेत.
रंगेहाथ पकडल्यावर दिली धमकी
दरम्यान, मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड असताना पकडल्यानंतर आपल्या चुकीची कबुली देण्यापेक्षा त्यानेच इतरांना धमकावले. यासंदर्भातील वाच्यता कुठे केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळले.
कॉलेज कॅम्पसमध्ये निदर्शने
ही घटना उघडकीस आल्यानंतर कॉलेज कॅम्पसमध्ये प्रचंड निदर्शने झाली. पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेकडो आंदोलकांनी कॉलेज परिसरात निदर्शने केली. तर, १९ सप्टेंबरपर्यंत कॉलेजमधील वर्गही स्थगित करण्यात आले होते. दरम्यान, तक्रारकर्त्यांनी केलेल्या आरोपांची पडताळणी करण्यासाठी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.