नवी दिल्ली : ‘नीट-यूजी’ व ‘नेट’ परीक्षांच्या पेपरफुटीवरून देशभर उसळलेल्या विद्यार्थ्यांच्या संतापाला विरोधकांकडून संसदेत वाट करून दिली जाण्याची शक्यता आहे. पेपरफुटीचा मुद्दा शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उपस्थित केला जाणार असून लोकसभेमध्ये विरोधकांकडून स्थगन प्रस्ताव सादर केला जाईल. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान संसदेमध्ये निवेदनाद्वारे केंद्राची भूमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता आहे.

पेपरफुटीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन केंद्राने दिले असले तरी देशभर आंदोलने सुरूच आहेत. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी ‘एनटीए’च्या (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यालय बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याआधी जंतर-मंतरवर आंदोलन झाले. पेपरफुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्याची आग्रही मागणी ‘इंडिया’ आघाडीने केली असून ती फेटाळली गेली तर विरोधकांकडून आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. या विषयावर दोन्ही सदनांमध्ये नोटीस दिली जाईल, अशी माहिती ‘द्रमुक’चे राज्यसभेतील खासदार तिरुचि शिवा यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students anger over neet ug and net exam paper bursts raised by opposition in parliament amy
First published on: 28-06-2024 at 05:39 IST