Agneepath Scheme Protest in Bihar अग्निपथ योजनेवरून देशभरात गदारोळ सुरू आहे. देशात अनेक ठिकाणी या अंदोलनाला हिंसाचाराचे वळण लागले आहे. गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. दरम्यान, या योजनेच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनांनी बिहार बंदची हाक दिली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने हा बंद पुकारला आहे. या योजनेला होणारा हिंसक विरोध पाहता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक बोलावली आहे. सकाळी साडेअकरा वाजता ते अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

विद्यार्थ्यांना शांततेने आंदोलन करण्याची परवानगी

अग्निपथ योजनेला विरोध होत असल्याने पाटणा येथील डाक बंगाल क्रॉसिंगवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. येथे अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. शहराचे पोलीस उपनिरीक्षक अंबरीश राहुल म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्थेचा सामना करण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. विद्यार्थ्यांना शांततेने आंदोलन करण्याची परवानगी आहे. मात्र, हिंसाचार केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा अंबरीश यांनी दिला आहे.

बिहार बंद दरम्यान ट्रक आणि बसला आग
अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बिहार बंदमध्येही जाळपोळ झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी जेहानाबादमधील तेहता ओपीच्या बाहेर उभा असलेला ट्रक आणि बस पेटवून दिली. याबाबत माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी पोहोचले आहे.

उत्तर प्रदेशात आतापर्यंत २६० जणांना अटक
अग्निपथ योजनेच्या विरोधात उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसक आंदोलनांमध्ये आतापर्यंत २६० जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बलियामध्ये १०९ जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर चार जिल्ह्यांत एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस सत्याग्रह करणार
अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस रविवारी सत्याग्रह करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी काँग्रेसचे सर्व खासदार, काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि पदाधिकारीही सहभागी होणार आहेत.

CAPF आणि आसाम रायफल्समध्ये अग्निवीरांसाठी १०% कोटा
अग्निपथ योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुणांना CAPF आणि आसाम रायफल्स सारख्या दलात १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. अग्निपथ योजनेबाबत देशभरातील तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना सरकारकडून ही घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय, CAPF आणि आसाम रायफल्समध्ये निर्धारित केलेल्या उच्च वयोमर्यादेतून ३ वर्षांची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अग्निवीरच्या पहिल्या तुकडीसाठी, विहित उच्च वयोमर्यादेपेक्षा ५ वर्षे वयाची सूट असेल.

Story img Loader