Mahashivratri 2025: देशभरातील विविध भागांत काल (बुधवारी) उत्साहात महाशिवरात्र साजरी करण्यात आली. अशात महाशिवरात्रीच्या दिवशी दिल्लीतील साउथ एशियन विद्यापीठाच्या मेसमध्ये मांसाहारी जेवण दिल्यावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यानंतर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी एकमेकांवर विद्यापीठात हिंसाचार भडकवल्याचा आरोप केला. दरम्यान या प्रकरणाबाबत विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नाही, परंतु दिल्ली पोलिसांनी सांगितले की, या घटनेबाबत अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार प्राप्त झालेली नाही. विद्यापीठ अंतर्गत चौकशी करत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार वाद आणि हाणामारी होत असल्याचे दिसून येत आहे.
फिश करी हिसकावण्याचा प्रयत्न
एका विद्यार्थ्याचे इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठात दोन मेस आहेत. त्यापैकी एका ठिकाणी २६ फेब्रुवारी रोजी फिश करी दिली जात होती. भाजपाच्या विद्यार्थी संघटनेच्या अभाविपशी संबंधित काही विद्यार्थ्यांनी मेसमध्ये घुसून फिश करी हिसकावण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मेस कमिटीशी संबंधित एका विद्यार्थिनीने याचा प्रतिक्रार केला तेव्हा त्यांनी तिच्यावर हल्ला केला.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की, या अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचे सदस्य या घटनेसाठी जबाबदार आहेत. दुसरीकडे, एबीव्हीपीचे म्हणणे आहे की, काही डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी उपवास मोडण्याचा प्रयत्न करत होते. महाशिवरात्रीसारख्या खास दिवशी मांसाहारी जेवण देण्याला अभाविपने “वैचारिक दहशतवाद” म्हटले आहे. महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी एबीव्हीपीशी संबंधित विद्यार्थ्यांनी महाशिवरात्रीला मेसमध्ये फक्त शाकाहारी जेवणच द्यावे अशी विनंती केली होती, असे सांगण्यात आले आहे. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
पोलीस काय म्हणाले?
याबाबत अधिक माहिती देताना, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “दुपारी ३:४५ वाजता मैदानगढी पोलीस ठाण्याला एसएयूमध्ये झालेल्या भांडणाबाबत पीसीआर कॉल आला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांना मेसमध्ये हाणामारी होत असल्याचे आढळले.”
“साउथ एशियन युनिव्हर्सिटीमध्ये एका विद्यार्थिनीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बुधवारचा आहे आणि मेसमध्ये जेवणाच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाला आणि नंतर हाणामारी झाली. पीडित विद्यार्थिनीने पीसीआर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. सध्या, पीडितेची वैद्यकीय तपासणी केली जात आहे आणि तिच्याकडून देण्यात आलेल्या तक्रारीचा तसाप सुरू आहे,” असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.