पतियाळा हाऊस न्यायालय संकुलात सोमवारी पत्रकार, विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात पोलिसांनी कुचराई केल्याची तक्रार एका याचिकेद्वारे करण्यात आली असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा नेता कन्हैयाकुमार याच्याविरुद्धच्या याचिकेवरील सुनावणीही होणार आहे.
सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, न्या. आर. भानुमती आणि न्या. यू. यू. लळित यांच्या पीठाने याचिकेची तातडीने सुनावणी घेण्याचे मान्य केले. ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंह यांनी या बाबत न्यायालयास सांगितले की, कन्हैयाकुमार याच्या पोलीस रिमांडची मुदत बुधवारी संपुष्टात येणार असून त्याला पतियाळा हाऊस संकुलातील महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे. या संकुलात सोमवारी हिंसाचाराचा उद्रेक झाला होता.
याचिकाकर्ते एन. डी. जयप्रकाश यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी सोमवारी बघ्याची भूमिका घेतली आणि न्यायालयाच्या संकुलात जमलेल्या निष्पापांवर अत्याचार केले. या प्रकरणातील आरोपी, त्यांचे नातेवाईक, मित्र, वकील आणि पत्रकार यांची सुरक्षा अबाधित राहावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना आवश्यक ते आदेश द्यावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.