डेहराडून : देशाच्या सीमेवरील काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये येणाऱ्या नैसर्गिक संकटांच्या मागे शत्रूंचा हात आहे का याचा तपशीलवार अभ्यास करण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी व्यक्त केले. या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नैसर्गिक संकटे वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
हेही वाचा >>> भाजप आदिवासीविरोधी असल्याचा आरोप
उत्तराखंडमधील जोशीमठाच्या जवळ धाक या गावामध्ये एका पुलाच्या उद्घाटनानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. ते म्हणाले की, हवामान बदल ही केवळ वातावरणाशी संबंधित घडामोड उरलेली नसून ती आता राष्ट्रीय सुरक्षेशी जोडली गेली आहे. यावेळी त्यांनी सीमाभागामध्ये पायाभूत सुविधांशी संबंधित अन्य ३४ प्रकल्पांचे उद्घाटन केले. वाढत्या नैसर्गिक संकटांबद्दल कोणत्याही देशाचे थेट नाव न घेता राजनाथ सिंह म्हणाले की, ‘‘उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि लडाखसारखी काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नैसर्गिक संकटांचे प्रमाण वाढले आहे. तज्ज्ञांचे मत आहे की ते हवामान बदलाशी संबंधित आहे. पण मला असे वाटते की, त्यामध्ये आपल्या शत्रूची काही भूमिका आहे का शोधण्यासाठी अभ्यासाची गरज आहे’’. संरक्षण मंत्रालयाने ही नैसर्गिक संकटे वाढत असल्याची बाब गांभीर्याने घेतली आहे असेही त्यांनी सांगितले. मित्रत्वाचे संबंध असलेल्या देशांच्या मदतीने याचा तपशीलवार अभ्यास करण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.