येथील नॅशनल जिओफिजिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट (एनजीआरआय) या संस्थेचे वैज्ञानिक नेपाळमधील भूकंपाचा विशेष अभ्यास करणार असून भूकंपप्रवण भाग नव्याने ठरवणार आहेत.
संस्थेचे प्रमुख मोहन राव यांनी सांगितले, की आमच्या संस्थेची पथके नेपाळच्या सीमेवर जात असून, तेथे भूकंपाच्या गुणधर्माचा अभ्यास करणार आहे. अजूनही भूकंपाचे लहान धक्के बसत असून, भूकंपाविषयी माहिती त्यातून येत्या काही दिवसांत गोळा करता येईल, भूकंपाच्या हानीची पातळी ठरवणे हाही त्यातील एक हेतू आहे.
आताच्या भूकंपाच्या अभ्यासातून मिळालेली माहिती ही भूकंप गतिकी व भूकंपप्रवण क्षेत्र समजून घेण्यात उपयोगी पडेल. अणुप्रकल्पांच्या दृष्टीने संवेदनशील भागही ठरवता येतील असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे राव हे या संस्थेचे प्रभारी प्रमुख असून ते सेंटर फॉर सेल्युलर  अँड मॉलिक्युलर बायॉलॉजी या संस्थेचे संचालक आहेत.
त्यांनी सांगितले, की भूकंपाचा अंदाज कुठल्याच पद्धतीने करता येत नाही व सध्या प्राणहानी व वित्तहानी नेमकी किती झाली याची माहिती घेणे आवश्यक आहे. येत्या चार-पाच महिन्यांत नेपाळमधील भूकंपाच्या अभ्यासाचा पहिला टप्पा पूर्ण होईल.
एनजीआरआय या संस्थेची भूकंपमापन यंत्रे हिमालयाच्या भागात कार्यरत आहेत. नेपाळमध्ये ७.९ रिश्टरचा जो भूकंप झाला त्याची नोंद एनजीआरआयच्या वेधशाळेतही झाली आहे. अजून चार-पाच दिवस मध्यम व काही मोठे धक्के बसत राहतील. मुख्य भूकंपानंतर ४० धक्के बसल्याची नोंद झाली असून त्यातील दोन जास्त तीव्रतेचे होते.
नेपाळमधील भूकंपाने पाच हजार बळी घेतले असून हा भूकंप इंडियन प्लेट व युरेशियन प्लेट यांच्या टकरीमुळे झाला. दरवर्षी या प्लेटस पाच से.मी.ने जवळ येत असतात. हिमालय व महाराष्ट्रातील कोयना हे भूकंप प्रवण भाग असून भूकंपाच्या स्थितीत लोकांना इमारतीतून उतरल्यानंतर एकत्र थांबण्यासाठी खास खुल्या जागा निर्माण केल्या पाहिजेत. जपानमध्ये भूकंपप्रवण क्षेत्रात जी हॉटेल्स आहेत तेथे टॉर्च लाईट, खाद्यवस्तू व इतर आवश्यक वस्तूंचा साठा आहे. अमेरिकेत जसा ९११ हा आपत्कालीन सेवेचा दूरध्वनी क्रमांक आहे तसा भारतात असायला हवा. शिवाय भूकंप प्रतिरोधक इमारती बांधण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

मेक्सिकोत भूकंप
वृत्तसंस्था, मेक्सिको सिटी
दक्षिण मेक्सिकोतील ओक्साका येथे मध्यम तीव्रतेचा भूकंप झाला,मात्र त्यात कुठलीही हानी झाली नाही. यूएस जिऑलॉजिकल सव्‍‌र्हेने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर होती व भूकंपाचे केंद्र ११० मीटर खोलीवर होते. भूकंपाचे केंद्र हे पालोमेरेसपासून १० कि.मी अंतरावर होते असे सांगण्यात आले.