Trump Vs Zelensky Viral Video: युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेले युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी काल (शुक्रवारी) व्हाईट हाऊसला भेट दिली होती. या भेटीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झेलेन्स्की यांची जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नव्हे तर, दोघांमध्ये संभाषण सुरू असताना ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मूर्ख राष्ट्राध्यक्ष (Stupid President) असा उल्लेख केल्याचेही पाहायला मिळत आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
खरं तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची युक्रेनने कोणत्याही किंमतीत युद्ध रोखण्यासाठी तयार व्हावे अशी इच्छा होती, म्हणूनच झेलेन्स्की यांना अमेरिका दौऱ्यावर बोलावण्यात आले होते. पण झेलेन्स्की पुतिन यांच्याशी कोणत्याही प्रकारच्या तडजोडीसाठी तयार दिसत नव्हते. संभाषणादरम्यान, त्यांनी पुतिन यांना खुनी देखील म्हटले. त्यांच्या या वर्तणुकीमुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प खूप संतापले.
आमच्या मूर्ख राष्ट्राध्यक्षामार्फत…
या बैठकीदरम्यान बोलताना ट्रम्प युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना म्हणाले, “तुमचा देश मोठ्या संकटात आहे. तुम्ही जिंकणार नाही आहात. आमच्यामुळे तुम्हाला सुरक्षितपणे बाहेर पडण्याची खूप चांगली संधी आहे. तुम्ही एकटे नाही आहात. आमच्या मूर्ख राष्ट्राध्यक्षामार्फत आम्ही तुम्हाला ३५० अब्ज डॉलर्स दिले आहे. आम्ही तुम्हाला लष्करी उपकरणे दिली आहेत. जर तुमच्याकडे आमची लष्करी उपकरणे नसती तर हे युद्ध दोन आठवड्यात संपले असते.”
पुतिन यांचे घाणेरडे काम
ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील तणावपूर्ण बैठकीनंतर, जागतिक नेते आणि अमेरिकन खासदारांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या संघर्षामुळे झेलेन्स्की यांचा व्हाईट हाऊस दौरा निष्फळ ठरला आहे, ज्यामुळे अमेरिका-युक्रेन संबंधांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेतील डेमोक्रॅटीक पक्षाच्या खासदारांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हितासाठी काम करत असल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना खासदार चक शूमर म्हणाले की, “ट्रम्प आणि व्हान्स पुतिन यांचे घाणेरडे काम करत आहेत. डेमोक्रॅटीक पक्ष स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी लढणे कधीही थांबवणार नाही.”
जागतिक नेत्यांचा युक्रेनला पाठिंबा
ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील बाचाबाचीनंतर नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांनी युक्रेनला पाठिंबा देण्याचा पुनरुच्चार केला. त्यांनी म्हटले की, “न्याय्य आणि शाश्वत शांततेच्या संघर्षात आम्ही युक्रेनच्या पाठीशी आहोत.” द गार्डियनच्या वृत्तानुसार, स्वीडनही युक्रेनच्या पाठीशी उभा आहे. अशाच भावना स्वीडिश पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनीही व्यक्त केल्या आहेत.