Crime News : राजस्थानच्या झुंझुनू येथे एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे, येथे सब- इन्स्पेक्टर (एसआय)ला स्पेशल ओपरेशन ग्रुप (SOG) ने अटक केली आहे. या प्रोबेशनरी एसआयने रजेसाठी अर्ज केला होता पण तिने या अर्जात लिहिलेल्या मजकूर वाचल्यानंतर वरिष्ठ अधिकार्यांना संशय आल्याने गंभीर प्रकरण समोर आले आहे.
दरम्यान या एसआयचे नाव मोनिका असून तिने २०२१च्या एसआय भरती परीक्षेत घवघवीत यश मिळवले होते. तिला या परीक्षेच्या निकालात ३४वी रँक मिळली होती. विशेष म्हणजे या महिला अधिकार्याला हिंदीच्या पेपरमध्ये २०० पैकी १८४ गुण मिळाले होते. असे असून देखील तिला रजेच्या अर्जात तिला स्वत:चे पद व्यवस्थित लिहिता आले नसल्याने वरिष्ठ अधिकार्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
नेमकं घडलं काय?
एसओजीच्या तपासात उघड झाले की, मोनिकाने अजमेर येथे परीक्षा केंद्रावर १५ सप्टेंबर २०२१ रोजी परीक्षा देताना ब्लूट्यूथ डिव्हाइस वापरून कॉपी केली होती. या सर्व प्रकरणाचा मोरक्या असलेल्या पौरव कालीर याला मोनिकाला उत्तरं पुरवण्यासाठी १५ लाख रुपये मिळाले होते. या प्रकारे मोनिकाला हिंदी विषयाच्या परीक्षेत २०० पैकी १८४ गुण आणि जनरल नॉलेज विषयात २०० पैकी १६१ गुण मिळाले होते.
लेखी परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या मोनिकाला मुलाखतीत अवघे १५ गुण मिळाले होते. एसओजीने दिलेल्या माहितीनुसार मोनिकाने कालीर याला १५ लाख दिल्याचे कबूल केले आहे. जेव्हा कालीर याला अटक करण्यात आली तेव्हा जयपूर पोलीस अकादमी येथे प्रशिक्षण सुरू असलेली मोनिका फरार झाली.
रजेच्या अर्जात एक चूक अन्…
मोनिका ही ५ जून २०२४ ते २ जुलै २०२४ या काळात वैद्यकीय रजेवर होती, पण तिने कोणतेही मेडिकल प्रमाणपत्र सादर केले नाही, पण तिने ११ नोव्हेंबर २०२४ रोजी जेव्हा पोलीस लाईन झुंझुनू येथे रूजू होण्यासाठी हाताने लिहिलेला अर्ज सादर केला तेव्हा त्यामध्ये मूलभूत साक्षरतेचा अभाव स्पष्टपणे दिसून आला.
मोनिकाने २० ओळींच्या अर्जात अनेक शब्द चुकीचे लिहिले होते, यामध्ये मी, इन्स्पेक्टर, प्रोबेशनर, डॉक्यूमेंट इतकेच नाही तर झुंझुनू सारखे साधे शब्द देखील चुकीचे लिहिले होते.