पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी देश सज्ज आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असून त्यांचे शनिवारीच दिल्लीमध्ये आगमन झाले. कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात इंडोनेशियाचे मार्चिंग पथक आणि बँड पथकदेखील सहभागी होणार आहे.

भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे सुबियांतो हे इंडोनेशियाचे चौथे अध्यक्ष आहेत. पहिल्या प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे पहिले अध्यक्ष सुकर्णो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुबियांतो यांचे स्वागत करण्यात आम्हाला बहुमान वाटतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले.

कर्तव्य पथावर दरवर्षी होणारे लष्करी संचलन सर्व भारतीयांसाठी विशेष आकर्षण असते. या संचलनामध्ये लष्करी शौर्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यांचा अनोखा संगम पाहायला मिळेल. भारताचा ‘वारसा’ आणि ‘विकास’ यांचे प्रतीकात्मक दर्शनही घडवले जाईल. ‘ब्रह्मोस’, ‘पिनाक’ आणि ‘आकाश’ यासारख्या काही अत्याधुनिक संरक्षण साधनांद्वारे आपल्या लष्करी सामर्थ्याची ओळख जगाला करून दिली जाईल. तसेच लष्कराची युद्ध पाळत यंत्रणा ‘संजय’ तर डीआरडीओची जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी ‘प्रलय’ यासारखी क्षेपणास्त्रेही यात असतील.

● भारतीय संविधानाची ७५ वर्षे संचलनाचा केंद्रबिंदू

● ‘सुवर्ण भारत – वारसा आणि विकास’ या कल्पनेवर आधारित चित्ररथांचे देखावे

● राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे १६ तर केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि संघटनांकडून १५ चित्ररथ

● चित्ररथांमध्ये तिन्ही सैन्यदलांशी संबंधित देखावा

● स्वदेशी अर्जुन युद्ध रणगाडा, तेजस लढाऊ विमान आणि प्रगत हलक्या हेलिकॉप्टरचा समावेश

● ‘मजबूत आणि सुरक्षित भारत’ या संकल्पनेवर आधारित लष्कराचे देखावे असतील.

● सी-१३० जे सुपर हर्क्युलिस, सी-२९५, सी-१७ ग्लोबमास्टर, पी-८ आय, मिग-२९ आणि एसयू-३० यासह इतर विमानांचाही समावेश

● उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, बिहार, झारखंड, गुजरात, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि दिल्लीचे चित्ररथ

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subianto is the fourth president of indonesia to attend india republic day celebrations as the chief guest amy