मागील तीन महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु आहे. तीन महिने उलटून गेले असले तरी हा युद्धसंघर्ष थांबताना दिसत नाहीये. या युद्धामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या जवळपास २० हजार भारतीय विद्यार्थ्यांना विशेष मोहीम राबवून परत भारतात आणण्यात आले आहे. मात्र याच विद्यार्थ्यांपुढे आता पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरुन भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. भारत सरकार या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काय करत आहे, असा सवाल त्यांनी केलाय.

हेही वाचा >>> “विस्थापित मावळ्यांना संघटित करून…”; स्वराज्य संघटनेबाबत संभाजीराजे छत्रपतींनी केली महत्त्वाची घोषणा

ट्विटच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. “युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेले भारतीय विद्यार्थी आता भारतातच निर्वासित झाले आहेत. या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी हरदीप पुरी पोलंडपर्यंत गेले. मात्र आता ते दिसत नाहीत. भारत सरकार या विद्यार्थ्यांसाठी काय करत आहे?” असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

हेही वाचा >>> “…ही हुकूमशाहीची सुरुवात नाही, टोक आहे”, ईडी कारवाईवरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. यातील बहुतांश विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले होते. युक्रेनमधील शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या मते, युक्रेनमध्ये भारतातील १८,०९५ हून अधिक विद्यार्थी होते. तर या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने विशेष मोहीम राबवली होती. विशेष विमानाने या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आले होते.

हेही वाचा >>> “मुख्यमंत्री म्हणतील, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती मग जिंकायची गरज काय? आजपासून…”; शरद पवारांच्या उमेदवारीवरुन खोचक टोला

दरम्यान, सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांतील युद्ध अजूनही सुरूच आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे सल्लागार ओलेक्सी अरेस्टोव्हिच यांनी दिलेल्या माहितीनुसार युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत युक्रेनच्या १० हजार सैनिकांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी अलीकडेच सोशल मीडियावर एक मुलाखत दिली होती. मुलाखतीदरम्यान विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी १० हजार सैनिकांचा मृत्यू झाल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे. याशिवाय युद्धात दररोज १०० युक्रेनियन सैनिक मारले जात असल्याची माहिती युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी अलीकडेच दिली होती.

Story img Loader