भाजपचे मंत्री सुटात ‘वेटर्स’ दिसतात, अशी टिप्पणी करणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या विधानावरून घुमजाव केले आहे. स्वामी यांचे हे विधान केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना उद्देशून असल्याची चर्चा होती. मात्र, आपल्या विधानाचा रोख अरूण जेटली यांच्याकडे नसल्याचे स्वामी यांनी शनिवारी स्पष्ट केले. मला एखाद्याला लक्ष्य करायचे असेल तर मी तसे उघडपणे करेन. खरंतर अरूण जेटली हे सुटात खूपच स्मार्ट दिसतात, असे सांगत स्वामी यांनी सारवासारव केली.
स्वामी यांनी शुक्रवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, भाजपने आपल्या मंत्र्यांना परदेश दौऱ्यात पारंपरिक व आधुनिक भारतीय पेहराव परिधान सांगितले पाहिजे. सुटात आणि टायमध्ये ते वेटर्ससारखे दिसतात, असे स्वामी यांनी म्हटले होते. आज दिवसभर त्यांच्या या विधानाची चर्चा रंगली होती. स्वामी यांनी ट्विटमध्ये कोणत्याही मंत्र्यांचे प्रत्यक्षपणे नाव घेतले नव्हते. मात्र, वृत्तवाहिन्यांवरून बिजिंग येथील उद्योजक आणि अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळात सुट घालून उपस्थित असणाऱ्या अरूण जेटली यांचे छायाचित्र दिसू लागल्यानंतर काहीवेळातच स्वामी यांनी हे ट्विट केले होते. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा रोख जेटली यांच्या दिशेनेच असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर स्वामी यांची विधाने सभ्यतेची मर्यादा ओलांडणारी असल्याच्या प्रतिक्रिया भाजपच्या गोटातून व्यक्त करण्यात आल्या होत्या.