भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्यावर टीका करताना थरूर म्हणजे नीच माणूस आहे असं वादग्रस्त वक्तव्य स्वामींनी केलं आहे. दुसऱ्यांचे धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करुन त्याजागी राम मंदिर बांधले जावे, अशी कोणत्याच चांगल्या हिंदूला वाटणार नाही, असे मत शशी थरुर यांनी एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले होते. थरुर यांच्या या वक्तव्यावरुन सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांचा समाचार घेतला असून वो नीच आदमी है असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.


ज्या माणसावर खूनाचा आरोप आहे, आणि ज्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे अशा माणसाने केलेल्या वक्तव्याबाबत काय प्रतिक्रिया द्यायची. तो नीच माणूस आहे. असं म्हणत सुब्रमण्यम स्वामी यांनी थरूर यांच्यावर आगपखड केली. दरम्यान, यापूर्वी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबात अशाच शब्दाचा वापर केला होता. गुजरात विधानसभा निवडणूकीदरम्यान काँग्रेसचे मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान मोदींना नीच माणूस असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अय्यर यांच्याविरोधात भाजपने रान उठवले होते. मोदींनीही प्रचारादरम्यान अय्यर यांच्या वक्तव्याचे भांडवल केले होते. त्यानंतर, काँग्रेसने काही काळासाठी त्यांचे पक्षातून निलंबन केलं होतं. त्यामुळे आता स्वामींच्या या वक्तव्यानंतर भाजपा काय प्रतिक्रिया देणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

काय म्हणाले होते थरूर –
रविवारी ‘द हिंदू लिटरेचर फॉर लाइफ’ फेस्टिवल आणि व्याख्यानमालेत बोलताना थरूर, ‘समस्त हिंदू समाजाला वाटते तसे एक हिंदू म्हणून मलाही यापूर्वी राम मंदिर बाबरी मशीदीच्या जागीच व्हावे असे वाटायचे. अयोध्या ही रामजन्मभूमी आहे, असा मोठ्या प्रमाणावर हिंदूंचा विश्वास आहे. मात्र, चांगल्या हिंदूंना दुसऱ्याचे प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त करुन त्याजागी राम मंदिर नको आहे’, असं म्हणाले होते.

Story img Loader