भारत आणि मालदीवच्या संबंधांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. मालदीवमधील भारतीय सैन्य, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला लक्षद्वीप पर्यटनाचा प्रचार, त्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी भारतीयांवर केलेली वर्णद्वेषी टीका, प्रत्युत्तरात भारतीय नागरिकांनी सुरू केलेली मालदीववर बहिष्कार टाकण्याची (पर्यटनाच्या बाबतीत) मोहीम, या सगळ्या घडामोडींमुळे उभय देशांमधील संबंध बिघडले आहेत. अशातच भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीव गांधी यांच्याप्रमाणे मालदीव प्रश्न हाताळण्याचा सल्ला दिला आहे.
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू नुकतेच चीनवरून माले (मालदीवची राजधानी) येथे परतले आहेत. मायदेशी परतताच मुइज्जू म्हणाले, भारताने १५ मार्चआधी मालदीवमधून आपलं सैनिक हटवावं. मुइज्जू यांनी भारताला सैन्य माघारी बोलावण्याचं फर्मान सोडलेलं असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला कोंडीत पकडलं आहे. स्वामी म्हणाले, मालदीवप्रश्नी मोदी शेपटू घालून बसणार की राजीव गांधींप्रमाणे मालदीवला सैन्य पाठवून तिथे सत्तांतर घडवणार?
स्वामी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, चीनचा दौरा करून मायदेश परत आलेले मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारत सरकारला १५ मार्चपर्यंत मालदीवमधून भारतीय सैन्य परत बोलवा अन्यथा परिणामांना सामोरे जायला तयार राहा, असा इशारा दिला आहे. नमक हराम मालदीवने भारतमातेच्या तोंडावर चिखलफेक केल्यानंतर पंतप्रधान मोदी शेपूट घालून बसतील की राजीव गांधी यांच्याप्रमाणे मालदीवला लष्कर, वायूदल आणि नौदल पाठवून सत्तांतर घडवतील?
आधीच्या सरकारच्या विनंतीनंतर भारताने सैन्य पाठवलं होतं
मालदीवमधील आधीच्या सरकारने भारताला विनंती करून मालदीवमध्ये भारतीय लष्कराची एक तुकडी तैनात करण्यास सांगितलं होतं. तिथली सागरी सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीतल्या बचाव कार्यासाठी भारतीय सैन्यदलाने आपली एक सैन्यतुकडी मालदीवला पाठवली होती. परंतु, नव्या सरकारने (मोहम्मद मुइज्जु) भारताला आपलं सैन्य परत बोलावण्यास सांगितलं आहे. भारतीय लष्कराबाबत मालदीवच्या अध्यक्षांच्या कार्यालयाने नोव्हेंबर २०२३ मध्ये एक निवेदन जारी केलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, आम्हाला आशा आहे, भारत आमच्या लोकांच्या लोकशाही इच्छेचा आदर करेल आणि आपल्या सैन्याला माघारी फिरण्याचा आदेश देईल.
हे ही वाचा >> इंडिगो अन् मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस, विमान वाहतूक मंत्रालयाने आजच मागितले उत्तर; नेमकं प्रकरण काय?
मोहम्मद मुइज्जू यांनी शनिवारी (१३ जानेवारी) चीनवरून मायदेशी परतल्यानंतर अप्रत्यक्षपणे भारताला इशारा दिला होता. मुइज्जू म्हणाले, भले आम्ही लहान देश असू शकतो, असं असलं म्हणून कोणालाही आम्हाला धमकावण्याचा किंवा दाबण्याचा परवाना मिळालेला नाही. मुइज्जू यांनी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. परंतु, त्यांचा रोख हा भारताकडे होता, असं म्हटलं जात आहे.