Subramanian Swamy Slams Narendra Modi And Gautam Adani : न्यूयॉर्कच्या न्यायालयाने २६५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या लाचखोरीच्या आरोपाखाली उद्योगपती गौतम अदानी आणि इतरांविरुद्ध सुरू असलेल्या तीन खटल्यांना एकत्र करण्याचे आदेश दिले आहेत. आता या सर्व खटल्यांची सुनावणी एकत्रितपणे केली जाईल, असा निकाल न्यायालयाने दिला. या तिन्ही खटल्यांमध्ये एकाच प्रकारचे आरोप असल्याने हा निर्णय दिल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
यानंतर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी एका इंग्रजी वृत्त संकेतस्थळाची बातमी एक्सवर पोस्ट करत, ऊर्जा क्षेत्रातील कंत्राटे मिळवण्यासाठी अदाणींनी २६५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी लाच दिल्याचा आरोप असल्याचे म्हटले होते. आता प्रशांत भूषण यांच्या एक्सवरील याच पोस्टवर प्रतिक्रिया देत माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये स्वामी यांनी म्हटले आहे की, “मोदींनी प्रत्येक नियम मोडत अदाणींना मोठे केले आहे.”
प्रशांत भूषण यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, “मोदींनी, अदाणींना ‘बागेच्या वाटेवर’ (चुकीच्या मार्गावर) नेल्यानंतर आता स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी त्यांना दूर केले आहे. अदाणी हे उपद्रवी आहेत, पण मोदींनीच प्रत्येक नियम मोडून त्यांना इतके मोठे केले. इतकेच नव्हे, तर मोदी त्यांच्यासाठी एक दिवस ग्रीसलाही गेले होते.”
काय आहे नेमकं प्रकरण?
उद्योगपती गौतम अदाणी आणि त्यांच्या सात अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरी प्रकरणी अमेरिकेतील न्याय विभागाने गेल्या महिन्यात गुन्हे दाखल केले आहेत. भारतीय अधिकाऱ्यांना जवळपास हजारो कोटी रुपयांची लाच देण्याची योजना आखून, त्या बदल्यात ऊर्जा क्षेत्रातील कंत्राटे मिळवणे, त्यासाठी अमेरिकी कंपन्यांकडून वित्तपुरवठा मिळवणे आणि याविषयी (अमेरिकेतील) गुंतवणूकदारांना अंधारात ठेवणे असे प्रमुख आरोप आहेत. अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डानेही अदानी समूहाच्या तेथील कंपन्यांच्या समभागांच्या उलाढालीसंदर्भात चौकशी सुरू केली आहे.
कोण आहेत सुब्रमण्यम स्वामी?
भारतीय जनता पार्टीकडून खासदार आणि केंद्रीय मंत्री राहिलेले सुब्रमण्यम स्वामी हे कायमच त्यांच्या भूमिकांसाठी आणि वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात. याचबरोबर गेल्या काही काळात स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्याने लक्ष्य केले आहे. इतकेच नव्हे तर गेल्या वर्षी पंढरपूरमध्ये आल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना रावणाशी केली होती. मोदींचा एकेरी उल्लेख करत मोदी फार अहंकारी असल्याचे ते म्हणाले होते.